कार्डची अदलाबदली करून करायचे फसवणूक , 50 सीसीटीव्ही तपासले  

मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यावर डल्ला मारल्याप्रकरणी एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. स्टीव्हन प्रसाद उमाप असे त्याचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

मूळचे बिहारचे रहिवासी असलेले रोशन यादव हे गेल्या आठवडय़ात मुंबईत नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. पैशाची गरज असल्याने ते साकीनाका येथील एका एटीएमजवळ गेले. त्या एटीएम केंद्राबाहेर गर्दी होती. यादव हे एटीएम सेंटरमध्ये शिरले तेव्हा एक जण आत गेला. पैसे काढून देतो असे सांगून त्याने यादवशी संवाद साधला. विश्वास बसावा म्हणून एका ठगाने यादवकडील कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकले. चुकीचा पासवर्ड टाकून त्याने यादवची दिशाभूल केली.

संधी मिळताच ठगाने यादवच्या कार्डची अदलाबदली केली. पैसे येत नसल्याने यादव हे नातेवाईकाकडे गेले. घरी गेल्यावर त्याना बँक खात्यातून पैसे गेल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक वाल्मीक कोरे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी साकीनाका ते उल्हासनगर येथील 50 फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना मोटरसायकलचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. त्या मोटरसायकलच्या माहितीच्या आधारे पोलीस उल्हासनगर येथे गेले. तेथून पोलिसांनी स्टीव्हनला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर स्टीव्हनने गुह्याची कबुली दिली. स्टीव्हन हा त्या एटीएम केंद्राबाहेर रेकी करत होता. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.