परराज्यातील आंब्याची हापूस म्हणून विक्री, विक्रेत्यांवर कारवाईचे पणन संचालकाचे आदेश

सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये परराज्यातून आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तथापी फळबाजार आवारातील व्यापाऱ्यांकडे येत असलेला आंबा हा त्या-त्या राज्यांच्या नावासह आंब्याच्या जातीने विक्री न करता तो ‘ महाराष्ट्रीयन हापूस ‘ या नावाने बाजारात विक्री होऊन ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार आढळून येत आहेत. त्यामुळे पणन संचालकांनी अशा आंबा विक्रीवर कायदेशीर कारवाईचे आदेश बाजार समितीच्या प्रशासनाला दिले आहेत .

राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी यासंदर्भात सर्व बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिला आहे . ज्या राज्यातून ज्या जातीचा आंबा बाजारात विक्रीसाठी आला आहे, तो त्याच नावाने विक्री करावा. महाराष्ट्रीयन हापूस म्हणून स्वराज्यातील वेगळ्या जातीच्या आंब्याची विक्री केल्यास बाजार समिती अधिनियमातील तरतुदीप्रमाणे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यातआले आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे परराज्यातून महाराष्ट्रात येणारा आंबा हा महाराष्ट्रीयन हापूस म्हणून काही विक्रेते , तसेच बाजार समित्यांच्या आवारामध्ये विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्याची गंभीर दखल घेऊन कृषिमंत्र्यांनी ज्या राज्यातून ज्या जातीचा आंबा बाजारात येईल, त्याच जाती आणि नावाने तो विक्री केला पाहीजे, अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी हे आदेश काढले.

रद्दी कोकणातली;आंबा कर्नाटकचा

कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणात हापूस महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये येतो. या हापूस आंब्याच्या पेट्या आणि बॉक्स यांच्यामध्ये विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीचा वापर करून आंब्याचे पॅकिंग केले जाते आणि हा आंबा देवगड किंवा रत्नागिरी हापूस असल्याचे भासवून बाजारात विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. अशा परराज्यातील आंब्याची चव आणि त्याचे गुणधर्म रत्नागिरी किंवा देवगड हापूसप्रमाणे नसल्याने ग्राहकांनीदेखील तक्रारी केल्या होत्या. याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या