बिश्नोई समाज सलमानला का नडला?

801

vishal-dp-photo>> विशाल अहिरराव । मुंबई

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान विरोधात काळवीट शिकारी प्रकरणी सुरू झालेला खटला तब्बल दोन दशकं लढवणाऱ्या बिश्नोई समाजाबद्दल अनेकांना माहीत नाही. पण हा विजय एकट्या कायद्याचा नसून बिश्नोई समाजाच्या श्रद्धेचा, विचारसरणीचा आणि जडणघडणीचा विजय आहे. कारण काळवीट शिकारी प्रकरणी बिश्नोई समाजाने २० वर्षं हा खटला लढला आहे. या बिश्नोई समाजाची प्राण्यांवर श्रद्धा आहे आणि या श्रद्धेखातर त्यांनी हा लढा दिला. म्हणूनच तर सलमानला शिक्षा झाल्याचा निकाल लागल्यावर या समाजातील लोकांनी फटाके फोडले.

या हायप्रोफाईल खटल्यात पुनमचंद बिश्नोई यांनी दिलेली साक्ष सलमानला दोषी ठरवण्यास पुरेशी ठरली. पुनमचंद हे लघुशंकेसाठी घराबाहेर गेले आणि सलमान काळवीटाची शिकार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुनमचंद बिश्नोईंनी जीपचा नंबर लिहून घेतला आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली. पुनमचंद हे बिश्नोई समाजाचे आहेत. बिश्नोई समाजाचा इतिहास जाणून घेतलं तर लक्षात येईल की हिंदुस्थानातल्या एका बड्या हस्तीला शिक्षेपर्यंत पोहोचवणं कसं शक्य झालं.

या फोटोतच सलमान खानच्या शिक्षेचं रहस्य

black-buck-women-milk-award

काही वर्षांपूर्वी डॉ. विनोद दवे यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. ज्याला जागतिक स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ज्यामध्ये एक महिला आपल्या मुलासोबत काळवीटाच्या पाडसाला देखील स्तनपान करवते आहे. वर तो फोटो दिला आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल. या फोटोतच सलमान खानच्या शिक्षेचं रहस्य आहे. कारण फोटोतील महिला बिश्नोई समाजाची आहे. या बिश्नोई समाजातील लोक प्राण्यांना एवढं प्रेम करतात की हरिण, काळवीट किंवा अन्य प्राण्यांच्या वासरांना गरज पडली तर या समाजातील महिला स्तनपान करून वाढवतात. त्यांना आपल्या मुलांप्रमाणे जपतात.

सलमानच्या शिक्षेचं उत्तर बिश्नोई समाजाचा इतिहास शोधताना सापडतं

बिश्नोई समाज हा प्रामुख्यानं राजस्थान राज्यात राहणारा एक लोकसमुदाय. बिश्नोई या नावाचं गाव थरच्या वाळवंटात आहे. तेथे ही जमात प्रामुख्यानं आढळते. या जमातीची स्थापना १५ शतकात गुरु जंभेश्वर यांनी केली. मुंशी हरदयाल यांच्या म्हणण्यानुसार बिश्नोई समाजाचे लोक गुरु जंभेश्वर यांना भगवान विष्णुचे अवतार मानतात. यात, २९ मार्गदर्शक तत्त्वं घालून दिली आहेत, ज्याचे पालन काटेकोरपणे केले जाते. भूतदया यापैकी प्रमुख आहे. या समाजीतील प्राणी व वृक्ष यावर यांचे विशेष प्रेम आहे. म्हणूनच प्राण्यांच्या शिकार, मांसाहार, वृक्ष तोडणं हा गंभीर गुन्हाच मानला जातो.

बिश्नोई समाजात कोणतेही अवडंबर नाही. परंतु, गुरु जंभेश्वर यांच्या विचार आणि कृतीवर येथे जोर देण्यात आला आहे. ते संपूर्ण जीवन कर्तव्य भावनेनं जगले. कर्म आणि श्रम याला त्यांनी अधिक महत्व दिलं होतं. तोच त्यांच्या जीवनाचा महत्वाचा उपदेश आहे.

हा समाज मूर्तिपूजा मानत नाही. त्यामुळे जंभेश्वर गुरुंचे मंदिर नाही. त्यांच्या वस्तू, खडावा मात्र जपून ठेवण्यात आल्या आहेत. अहिंसेला या समाजात खूप महत्त्व आहे. जीवहत्या निंदा या समाजात केली आहे. हिंसेविरोधात श्री जंभेश्वर गुरुजींनी सर्व धर्मांवर टीका केली होती. मुक्या प्राण्याची हत्या का करता? ज्याचं दूध पिऊन आपण पुष्ट होतो त्यांच्यावर शस्त्र का उचलतो? मुक्या प्राण्यांच्या भावना तुम्हाला कळत नाही का?, असा सवाल त्यांनी केला होता.

हा समाज प्राणी हत्या करत नसल्यानं मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे. तसंच कोणी शिकार केल्यास अथावा मांसाहार केल्यास कडक शासन केलं जाते. तसेच आपल्या गावाच्या कक्षेत अन्य व्यक्तींना देखील ते शिकार करू देत नाही. या भागात हरिण, काळवीट यांची संख्या मोठी आहे.

बीकानेर राज्याच्या एका परवान्यातून हे लक्षात येते की, तालवाचे महंत दीने नावाच्या व्यक्तीला पशुहत्येच्या शंकेवरून त्याच्याकडील मेंढा जप्त केला होता. कोणत्याही व्यक्तीला नियमांविरुद्ध कार्य करण्यापासून रोखण्यासाठी बिश्नोई गावात एक पंचायत होती. नियमांच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीला समाजातून बाहेर काढले जायचे, तसेच त्याच्याकडे कोणतंही पद दिलं जात नव्हतं. बाबू नावाच्या एका व्यक्तीने रुडकली गावात एक कोंबडी कापली होती तेव्हा त्याला समाजातून हाकलून लावण्यात आलं होतं.

बिश्नोई गावात कोणीही व्यक्ती खेजरी (शमी) वृक्ष किंवा हिरव्यागार वृक्षांच्या फांद्या कापू शकत नव्हता. ज्यांनी असा गुन्हा केला, त्यांनी स्वत: आत्मोत्सर्ग केला असे सांगितले जाते. गुरु जंभेश्वर महाराज यांच्या संदर्भातील साहित्यात याची माहिती मिळते.

राजस्थानच्या राजांनी देखील या सम्प्रदायाला मान्यता देऊन नेहमी त्यांच्या धार्मिक गोष्टी जपल्या आहेत. म्हणूनच जोधपूर व बिकानेर राज्य असताना वेळोवेळी तिथल्या प्रमुखांना तसे आदेश देण्यात आल्याचे इतिहासात वाचायला मिळते.

१७३०मध्ये जोधपूरच्या राजाने खेजरी (शमी) वृक्ष कापून आपला राजवाडा बांधण्याचे आदेश दिले होते. तेव्हा अमृता देवी बिश्नोई आणि तिच्या तीन मुलींनी त्या झाडांना घट्ट धरून ठेवले. राजाच्या आदेशानंतर त्यांना मारण्यात आले. मात्र त्यानंतर बिश्नोई समाज आणखी खवळला. त्यांनी देखील आंदोलन केलं. शेकडो लोकांना राजानं यमसदनी धाडलं. तरी विरोध सुरू होता. या अमृता देवींच्या उदाहरणातून प्रेरणा घेऊन ‘चिपको आंदोलन’ करण्यात आले होतं.

हा इतिहास वाचल्यावर नक्की कळतं सलमान खान सारख्या हायप्रोफाईल व्यक्तीला देखील नडण्याची ताकद ही त्यांच्या श्रद्धेतून आली आहे. या समाजाला आदिवासी म्हणून संबोधलं जातं. या समाजातील काही चालीरिती कालबाह्य झाल्या असली तरी पण मूक्या प्राण्यांना आपल्या मुलांप्रमाणे जपणाऱ्या, वृक्ष वनस्पतींसाठी जीव अर्पण करणाऱ्या बिश्नोईंना जुनाट विचारांचं मानणं कितपत योग्य असा प्रश्न पडतो. पण कायद्यासह श्रद्धेची जोड मिळाली तर कितीही वजनदार व्यक्ती असली तरी तिचा उन्मत्तपणा संपवता येतो, हेच यातून स्पष्ट होतं.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या