सलमानची एंट्री होताच सुतळी बॉम्बचा धमाका, मालेगावच्या चित्रपटगृहातील घटना

40

सामना प्रतिनिधी, नाशिक

मालेगावमध्ये मोहन चित्रपटगृहात टय़ूबलाईट सिनेमा पाहणाऱ्या चाहत्यांनी सलमान खानची पडद्यावर एंट्री होताच सुतळी बॉम्ब फोडले. या धमाक्याने प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि बचाव-बचाव म्हणत त्यांनी आरडाओरड सुरू केली. चित्रपटाचे प्रक्षेपण बंद करून टय़ूबलाईटच्या प्रकाशाचा लखलखाट करण्यात आला. उत्साहाच्या भरात सलमानच्या चाहत्यांनी सुतळी बॉम्ब फोडल्याचे माईकवरून सांगताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नऊ तरुणांना अटक केली आहे.

नवजीवन हॉस्पिटलजवळील मोतीभवन येथील मोहन सिनेमागृहात सोमवारी रात्री सवादहा वाजता अभिनेता सलमान खानचा ‘टय़ूबलाईट’ हा चित्रपट सुरू होता. पडद्यावर सलमान खानची एंट्री होताच अचानक अतिउत्साही तरुणांनी सुतळी बॉम्ब फोडून एकच धमाका उडविला. यामुळे प्रेक्षकांमध्ये घबराट उडाली. मात्र सिनेमागृहाच्या व्यवस्थापकाने काही क्षणात प्रक्षेपण बंद करून सर्व टय़ूबलाईट सुरू केल्या आणि वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली, घाबरून जावू नका, असे आवाहन केले.

चित्रपट पुन्हा सुरू करून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी साकीर अहमद रफीक अहमद, अज्जू रहेमान मोहम्मद रज्जाक, निसार खान रमजान खान, शेख मोसीन शेख युसूफ, शहजाद अली खान शौकत अली, मोहम्मद हासीफ मोहम्मद इब्राहम, मोहम्मद पापा मोहम्मद अकबर, मोहम्मद सलमान मोहम्मद इस्लाम व अल्ताफ शेख अक्रम या नऊजणांना अटक केली.

मंगळवारी एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर बुधवारी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आता या तरुणांची जामिनासाठी धडपड सुरू आहे. फटाके फोडण्याचे प्रकार मालेगावात नेहमीच होतात, मात्र, यावेळी सुतळी बॉम्ब फोडण्यात आले. यामुळे आग भडकू शकली असती व प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असा ठपका ठेवून या तरुणांवर पोलिसांनी वरील कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या