कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या सलमानवर सव्वा रुपयाची उधारी, भर कार्यक्रमात दिली कबुली

877

अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसच्या 13व्या सिझनमध्ये चांगलाच व्यग्र आहे. चित्रपट, जाहिराती, रियालिटी शोज यांमधून तो कोट्यवधींचं मानधन घेतो. मात्र, अशा सलमानवर अवघ्या सव्वा रुपयाचं कर्ज असल्याची कबुली खुद्द त्यानेच जाहीररित्या दिली आहे.

मुंबई पोलिसांसाठी भरवण्यात येणाऱ्या उमंग या कार्यक्रमात त्याने नुकतीच ही कबुली दिली. विनोदवीर कपिल शर्मा याला सलमानने आपल्यावर सव्वा रुपयाचं कर्ज असल्याचं सांगितलं. सलमान काही दिवसांपूर्वी त्याच्या सायकलच्या टायरच्या दुरुस्तीसाठी एका मेकॅनिककडे गेला होता. तेव्हा त्याला त्याच्यावरच्या कर्जाबाबत कळल्याचं त्याने कपिलला सांगितलं.

सलमान म्हणाला की, मी सायकलचा टायर दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिककडे गेलो होते. त्यावेळी घरच्याच कपड्यांवर होतो आणि माझ्याकडे एक रुपयाही नव्हता. त्यामुळे मेकॅनिक काकांना मी सायकल दुरुस्तीचे पैसे नंतर देतो, असं सांगितलं. तेव्हा त्यांनी ‘तू लहानपणीही असेच पैसे न देता जायचास. याआधीही सायकल दुरुस्तीचा सव्वा रुपया तू दिलेला नाहीस. ते पैसे तुझ्यावर उधार आहेत’, असं सांगितलं. हे ऐकून मला माझीच लाज वाटली. मग मी त्यांना त्यांचे पैसे देऊ केले, तेव्हा त्यांनी ते स्वीकारले नाहीत. ते पैसे उधारच आहेत, अशी कबुली यावेळी सलमान खानने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या