उत्तर प्रदेशात समाजवादाची ‘डबल सीट’

54

<< दिल्ली डायरी >> <<  नीलेश कुलकर्णी   [email protected] >>

राजकारणाच्या आखाडय़ात आजवर विरोधकांना अस्मान दाखविणारे समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांना त्यांचे मुख्यमंत्री चिरंजीव अखिलेश यांनीच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आखाडय़ात चितपट केले आहे. समाजवादी पक्षाचे सायकलहे निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाकडून पटकविण्यात अखिलेश गट यशस्वी झाल्याने मुलायमसिंग यांना पक्षात आणि एकूणच राजकारणात अस्तित्वाचा लढा देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वडिलांवर राजकीय मात केलेल्या अखिलेश यांनी सध्या गटांगळ्य़ा खात असलेल्या काँग्रेसला सायकलच्या कॅरियरवरचा एक कोपरा देऊन जाऊया डबलसीट रं लांब लांबअसा हकारा दिला आहे. त्यामुळे मरणासन्न काँग्रेसलाही थोडी तरतरी आली आहे. तर त्याचवेळी सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदी यांच्या राजकीय फायद्याची स्वप्ने पाहणाऱया भाजपलाही जमिनीवर आणले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची राजकीय धुळवड कधीच सुरू झाली आहे. त्यातही मागील १५-२० दिवस सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या यादव कुळातील भाऊबंदकी समाजवादी पक्षात उभी फूट पाडते की काय अशी चिन्हे होती. मात्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वडील मुलायम आणि काका शिवपाल यांच्यावर राजकीय मात केली. समाजवादी पक्षाचे बहुसंख्य आमदार आणि खासदार अखिलेश यांच्याच पाठीशी दिसले. सायकल हे चिन्हंही निवडणूक आयोगाने अखिलेश गटाला बहाल केले. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांच्या हाताशी केवळ शिवपाल, अमरसिंग आणि काही नटनटय़ा असा ‘समाजवाद’ शिल्लक राहिला आहे. अखिलेश नावाचे नवे शक्तिकेंद्र देशाच्या राजकीय पटलावर अस्तित्वात आले आहे. त्यांच्याबद्दल राज्यात सहानुभूतीची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत अखिलेश यांच्यासाठी सहानुभूतीची लाट आली, त्याला काँग्रेसच्या परंपरागत ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित मतपेटीचा आधार मिळाला, बसपा पिछाडीवर पडल्याचे लक्षात आल्यावर दलित मतदार एकगठ्ठा ‘डबलसीट’वर विराजमान झाला तर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ७१ जागा जिंकून पाशवी विजय मिळविणाऱ्या भाजपची अवस्था बिहार विधानसभा निवडणुकीसारखी केविलवाणी होऊ शकते. अर्थात अखिलेश यांना अचानक मिळालेल्या या राजकीय ताकदीचा ते कशा पद्धतीने वापर करतात यावरदेखील बरीच गणिते अवलंबून आहेत. काँग्रेसशी आघाडीचा हात पुढे करून अखिलेश यांनी तशी चुणूक दाखविली आहे.

सर्वसाधारणपणे यूपीमध्ये समाजवादी पक्ष सत्तेवर आला की गुंडागर्दी, दहशतीचे वातावरण असते. यावेळी अखिलेश यांनी अंशतः का होईना त्यात बदल करून जनतेला एक बऱ्यापैकी सरकार दिले. दंगलीसाठी शिवशिवणाऱ्या हातात लॅपटॉप दिला. मुख्तार अन्सारी अतिक अहमदसारख्या कुख्यात गुंडांचा पक्षप्रवेश रोखला. त्यामुळे अखिलेश यांची आपोआपच प्रतिमा निर्मिती झाली आहे व नवमध्यमवर्गाचा पाठिंबा त्यामुळे त्यांना मिळण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही. त्यातच नेमक्या कोणत्या मुद्दय़ावर निवडणुकीला सामोरे जायचे याबाबत संभ्रम आहे. अच्छे दिनची लाट कधीच विरली आहे तर नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राइक भाजपवरच उलटण्याची वेळ आली आहे. बसपाची अवस्थाही फारशी चांगली नाही. त्या पक्षाचे केडर पूर्वीसारखे तगडे राहिलेले नाही. त्यात ब्राह्मण नेत्यांच्या नाराजीमुळे मायावतींच्या बहुचर्चित ‘सोशल इंजिनीयरिंग’ला तडा जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी काँग्रेससोबतच्या ‘डबलसीट’ला जोरदार पायडल मारून आगेकूच सुरू केले आहे. समाजवादाची ही ‘नवी डबलसीट’ सध्या तरी जोरात पळते आहे. तिला राजकीय पंक्चर’ करण्याचे प्रयत्नही होतील. ही ‘डबलसीट’ सत्तेची शर्यत पूर्ण करते का ते दिसेलच!

‘१० राजाजी मार्गप्रणवदांचा नवा पत्ता

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. वास्तविक राष्ट्रपतीपदी फेरनियुक्ती होण्याची सुसंधी असूनही प्रणवदांनी आपल्याला आता स्वारस्य नाही असे सांगून निवृत्तीची तयारी केली आहे. आपल्या पत्नीच्या निधनानंतर प्रणवदा काहीसे एकाकी पडले आहेत. केंद्रात अनेक मंत्रीपदे भूषविल्यानंतर योग्यता असूनही काँग्रेसने त्यांना पंतप्रधानपदाची संधी दिली नाही ही सल मनात असलेल्या प्रणवदांनी राष्ट्रपतीपदाच्या मिळालेल्या संधीचे सोने केले. आता निवृत्तीनंतरचाही त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. प्रणवदांचे एक पुत्र अभिजित हे लोकसभेचे खासदार आहेत तर कन्या शर्मिष्ठाही राजकीय बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहेत. असे असले तरी प्रणवदांना आता राजकारणाचा पुरता उबग आला आहे. त्यामुळेच निवृत्तीपूर्वीच त्यांनी माझ्यासाठी जिथे शांतपणे वाचनाची हौस पुरी करता येईल अशी एखादी शांत जागा शोधण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम राहत असलेल्या १०, राजाजी मार्ग हा डय़ुप्लेक्स फ्लॅटमध्ये प्रणवदांच्या शिफ्टिंगची तयारी सुरू झाली आहे. सध्या हा बंगला सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांच्याकडे आहे. मात्र या बंगल्यातील एका फ्लोअरवर संपूर्णपणे लायब्ररी आहे. त्यामुळे प्रणवदांनी या बंगल्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. सुमारे ३००  एकरावरील प्रशस्त अशा २८५ खोल्यांच्या राष्ट्रपती भवनाला अलविदा करून १०, राजाजी मार्गावर शिफ्ट होण्यास प्रणव मुखर्जी तत्पर आहेत. अर्थात प्रणवदांचा वारसदार कोण याचीही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

तुझ्या गळा माझ्या गळा

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही याचा प्रत्यय पुन्हा येत आहे. मोदी आणि नितीशकुमारांना एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाते. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे बाशिंग दोघांनीही गुडघ्याला बांधले होते. नितीशकुमारांनी विरोध करूनही मोदी पंतप्रधान बनलेच तर नितीशकुमारांना हरविण्यासाठी सगळे हथकंडे वापरूनही नितीशबाबूंनी पुन्हा बिहारचे मुख्यमंत्रीपद पटकावले. हा नजीकचा इतिहास सर्वश्रुत असला तरी नुकतेच गुरुग्रंथसाहिबाच्या कार्यक्रमानिमित्ताने मोदी व नितीशबाबूंनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. लालूप्रसाद आणि त्यांच्या मुलांच्या मुजोरीला नितीशबाबू कंटाळले आहेत; तर रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जितनराम मांझींच्या कारभाराला मोदी वैतागले आहेत. त्यामुळे मोदींच्या नोटाबंदीचे नितीशबाबूंनी वारेमाप कौतुक केले तर नितीशबाबूंच्या दारूबंदीच्या निर्णयाच्या कौतुकासाठी पंतप्रधानांकडे शब्द अपुरे पडले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप व नितीशबाबूंमध्ये ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ असे सुरू होते की काय अशी राजकीय चर्चा रंगली आहे. नितीशबाबूंनी दारूबंदीविरोधात दीड कोटी जनतेची मानवी शृंखला उभारण्याचा संकल्प केला. त्यात सहभागी होण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र कालपरवापर्यंत नितीशकुमारांना उठताबसता शिव्यांची लाखोली वाहणारे भाजप नेते नितीशबाबूंना पघळल्यामुळे एनडीएतील इतर नेते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, केंद्रीयमंत्री उपेंद्र कुशवाह तसेच माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दारूबंदीचा निर्णय तुमचे तुम्हाला लखलाभ असो, आम्ही त्यात सहभागी होणार नाही असा सज्जड इशाराच भाजपला दिला आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या