हिंदुस्थानी लष्कर बलात्कारी! आझम खान यांचे डोके फिरले

26

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

समाजवादी पार्टीचे सरचिटणीस आझम खान यांचे डोके फिरले आहे, यावर शिक्कामोर्तब करणारा त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकडय़ांकडून सीमेवर सतत होत असलेल्या हल्ल्यांना थोपवताना बलिदान देणा्या हिंदुस्थानी जवानांना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. देशाचे लष्कर बलात्कारी आहे, असा चीड आणणारा आरोप आझम खान यांनी आपल्या भाषणात केला आहे.

कश्मीर, झारखंड आणि आसाम या राज्यांत आपल्या लष्कराच्या जवानांना महिलांनी ठार मारले असून त्यांची गुप्तांगे छाटून टाकली आहेत. बलात्कारी जवानांविरोधात हे टोकाचे पाऊल महिलांना उचलावे लागले हे वास्तव आहे, असे आझम खान यांनी रामपूर येथील जाहीर सभेतून सांगितले. त्यांच्या त्याच भाषणाचा व्हिडीओ बाहेर आला असून त्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

बलात्कारी लष्कराला महिलांनी धडा शिकवल्याच्या त्या घटनेतून जगाला गेलेला संदेश हिंदुस्थानला लाजवणारा आहे, असे ते म्हणाले. जगाला आपण तोंड कसे दाखवणार, असा सवालही आझम खान यांनी केला.

‘सपा’तून हाकला : भाजप
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन लष्कराच्या जवानांची निंदानालस्ती करण्याची फॅशनच आलीय, असे सांगत आझम खान यांची समाजवादी पार्टीने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. आझम खान हे धर्माच्या आधारे देशाची फाळणी करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला, तर भाजप नेते जीव्हीएल नरसिंह म्हणाले की, आझम खान हे फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांसाठीच बोलत आहेत. त्यांचा पक्ष अशी वक्तव्ये करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करीत आहे.

हिंदुस्थानने सहा दशकांची वाटचाल केलेला मार्ग बदलला आहे. ‘बॅलट’ऐवजी ‘बुलेट’ हा नवा मार्ग आहे. त्याचा परिणाम जम्मू-कश्मीरमध्ये आपण पाहतच आहोत. – आझम खान, सरचिटणीस, समाजवादी पार्टी

आपली प्रतिक्रिया द्या