ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन, बॉलीवूडवर शोककळा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांचं गुरुवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. मुख्य अभिनेता, सहकलाकार, खलनायक अशी कोणतीही भूमिका अगदी सहज वठवणाऱ्या विनोद खन्ना यांच्या निधनानं सारं बॉलीवूड आणि त्यांच्या तमाम चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

असे होते विनोद खन्ना

विनोद खन्ना हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगानं आजारी होते. मुंबईतील हरकिसन दास रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालवत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

६ ऑक्टोबर १९४६ रोजी पेशावर (पाकिस्तान) येथे पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शाळा-कॉलेजच्या वयात त्यांना चित्रपटात काम करावं अशी इच्छा झाली आणि ते या क्षेत्राकडे वळले.विनोद खन्ना यांचे मुक्कदर का सिकंदर, दयावान, अमर अकबर अँथोनी, कुर्बानी, हाथ की सफाई, हेराफेरी हे चित्रपट गाजले. त्यांच्या भूमिका कायमच चर्चेत राहायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा, साधेपणा, अभिनयातली सहजता यामुळे त्यांचा चाहता वर्ग वाढतच गेला. बॉलीवूडमधील कलाकारांनी देखील विनोद खन्ना यांच्या कामाचं आणि वागण्याचं कायम कौतुक केलं. त्यांच्या निधनानं एका बड्या कलाकाराला बॉलीवूड मुकलं अशी भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे.

साश्रू नयनांनी विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप

राजकारण

विनोद खन्ना यांनी चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळवलाच पण त्याच बरोबर त्यांनी राजकारणातही महत्वाची भूमिका निभावली. १९९७ मध्ये ते भाजपचे खासदार म्हणून पंजाबच्या गुरदासपूर या मतदार संघातून लोकसभेत पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर १९९९, २००४ मध्येही ते खासदार म्हणून निवडून आले. २००९मध्ये मात्र ते लोकसभा निवडणूक हरले. असं असली तरी त्यांनी हार मानली नाही. २०१४ मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि ते लोकभेवर निवडून आले. २००२ मध्ये त्यांनी केंद्रात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून कारभार सांभाळला. तर सहा महिन्यांनी त्यांना परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री असं महत्वाचं पद देण्य़ात आलं.

आपली प्रतिक्रिया द्या