विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात भाजपला जोरदार दणका बसला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक कागलचे समरजीतसिंह घाटगे यांनी ‘कमळ’ चिन्ह हटविले आणि आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हाती ‘तुतारी’ घेण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली आहे. 3 सप्टेंबरला कागलमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
गेल्या 10 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले समरजीतसिंह घाटगे यांना गेल्या वेळी विधानसभेसाठी भाजपने डावलल्यामुळे अपक्ष लढावे लागले होते. आताही त्यांना भाजपमधून विधानसभा लढविण्यासाठी उमेदवारी मिळेल, अशी आशा होती; पण महायुतीमध्ये अजित पवार गट सामील झाला. कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री बनले. मुश्रीफ यांनी गेल्या वेळी ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. मात्र यावेळी पुन्हा मुश्रीफ हेच महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे भाजपकडून समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. समरजीतसिंह घाटगे यांनी वेळोवेळी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
आज कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी बोलाविला होता. त्या वेळी घाटगे म्हणाले, ‘‘आजपर्यंत देवेंद्र फडणवीस सांगतील ते काम केले. निवडणुकीत माघार घेतली; पण आता मात्र कार्यकर्त्यांमध्येही नाराजी व्यक्त होऊ लागल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.’’ या वेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येत्या 3 सप्टेंबर रोजी कागलच्या गैबी चौकात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटगे हे ‘तुतारी’ हातात घेऊन पक्षप्रवेश करतील, असे जाहीर केले. घाटगे यांच्या या निर्णयामुळे कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर पुन्हा एकदा तगडे आव्हान निर्माण झाले असून मुश्रीफ यांच्या निवासस्थानाशेजारी गैबी चौकातच हा पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे येत्या 3 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार मुश्रीफ यांचा समाचार कसा घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.