अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनलची सत्ता, १७ पैकी १६ जागांवर विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलची पुन्हा सत्ता आली. १७ पैकी १६ जागांवर समर्थ पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. चित्रकर्मी पॅनलचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. काही विभागात ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. चाळीस ते पन्नास मतांच्या फरकामुळे शेवटपर्यंत सर्वांची उत्सुकता ताणली गेली. दोन्ही पॅनेलला पर्यायी म्हणून १६ अपक्ष रिंगणात उतरले होते, पण त्यांना सभासदांनी नाकारले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातही महायुतीतील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून अभिनेत्री नीलम शिर्के यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे समोर आले. त्यामुळे चित्रपटसृष्टीतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. विरोधी पॅनलचे विजय पाटकर यांनीही यावर थेट नाराजी व्यक्त केली होती. पण ऐनवेळी नीलम शिर्के यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासाठी माघार घेत धक्कातंत्र अवलंबले. त्यामुळे विरोधी चित्रकर्मी पॅनलच्या एकमेव वर्षा उसगावकर या बिनविरोध निवडून आल्या. शिवाय उमेदवारी अर्ज न आल्याने सत्ताधारी समर्थ पॅनलचे संकलक गटातून विजय खोचीकर व गायन गटातून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

एकूण १७ जागांपैकी तीन बिनविरोध झालेल्या जागा वगळता, उर्वरित १४ जागांसाठी सत्ताधारी समर्थ पॅनल आणि विरोधी चित्रकर्मी पॅनल आणि या दोन्ही पॅनलना पर्याय म्हणून १६ अपक्ष असे एकूण ४४ उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले होते. रविवारी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक या भागात १२ मतदान केंद्रांवर केवळ ४९.९० टक्के मतदान झाले. निम्म्याहून अधिक मतदारांनी पाठ फिरवल्याने याचा फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण बहुतांश ठिकाणी अपक्षांच्या मत विभागणीचा फायदा सत्ताधाऱ्यांना मिळाल्याचे दिसून आले.