शिवसेना एकमेव पक्ष भगव्या झेंडय़ाखाली! बाकीच्यांनी झेंडय़ाला इस्लामी पाचर मारले

108

सामना ऑनलाईन, वाई

‘महाराष्ट्र राज्यच नव्हे, तर संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य व्हावे, यासाठी भगव्या ध्वजाखाली सर्व हिंदूंनी एकत्र यावे. सध्या प्रत्येक पक्षाच्या झेंडय़ात इस्लामी पाचर मारलेले आहे. केवळ शिवसेनाच भगव्या झेंडय़ाखाली उभी आहे. राजकारण्यांनी भगवा झेंडा घेऊनच राजकारण करावे,’ असे परखड मत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. दरम्यान, राज्यातील प्रत्येक गावात युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांची आठवण म्हणून ‘बलिदान मास’ करण्यासाठी जनजागृती करावी. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या ३२ मण सुवर्णसिंहासनासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.जांभळी (ता. वाई) येथे प्रतापगड ते रायरेश्वर या गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

भिडे गुरुजी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासननिर्मितीसाठी केंद्र व राज्यातील मंत्री, नेते मदत करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, महाराजांच्या सिंहासनासाठी बरबटलेल्या हातांकडून कुठलीही मदत स्वीकारणार नाही. संबंधितांनी भगवे राज्य केल्यास त्यांच्याकडून सर्व प्रकारची मदत स्वीकारू.  ‘मराठय़ांनी दिल्ली काबीज करून १४ वर्षे शासन केले. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करायची आहे. यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागले पाहिज, असे आवाहन भिडे गुरुजी यांनी केले.

इतिहासाचे अभ्यासक मुकुंदराव दातार म्हणाले, ‘आपल्याला केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश घडवायचा आहे. धारकरी येथे आल्यानंतर एकदिलाने राहतात. मग येथून गेल्यानंतर प्रत्येक गावात ‘एक गाव, एक पाणवठा’ का करीत नाहीत? लाल किल्ला, ताज महाल मराठय़ांनी बांधला नाही. वास्तू बांधण्यापेक्षा मराठा देश बांधण्याचे काम करतो. देश अडचणीत असताना प्रत्येक वेळी मराठाच मदत करतो, हा इतिहास आहे.

‘छत्रपती संभाजीराजांचे निधन एका दिवसात झाले नसून, त्यांना पकडल्यानंतर वढू बुद्रुक येथे सलग ३० दिवस हाल करून त्यांना ठार मारण्यात आले. त्यामुळे हा संपूर्ण महिना सुतक म्हणून पाळला गेला पाहिजे. यासाठी युवकांनी गावागावात जनजागृती करून ‘बलिदान मास’ पाळण्यास प्रोत्साहित करावे.

आपली प्रतिक्रिया द्या