संभाजी ब्रिगेडच्या हाती नारळ

मुंबई – कोणाला ‘बॅट’ तर कोणाला ‘हॅट’ आणि कोणाला ‘फुगा’ तर कोणाला ‘अंगठी’ ही गिफ्टस् नाहीत तर ही आहेत यावेळच्या महापालिका निवडणुकीत उभ्या राहिलेल्या विविध उमेदवारांना दिलेली मतदान चिन्हे! 227 जागांसाठी तब्बल 2275 उमेदवार अंतिमतः रिंगणात असून नव्याने आलेले पक्ष आणि अपक्ष यांना नुकतेच चिन्हांचे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे संभाजी ब्रिगेड या वादग्रस्त संघटनेने निवडणुकीत उमेदवार उभे केले असून त्यांना निवडणुकीआधीच ‘नारळ’ मिळाला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान चिन्हांचेही उमेदवारांना वाटप केले. त्यातील धुनष्यबाण, कमळ, हात, घडय़ाळ, इंजिन ही प्रमुख पक्षांची चिन्हे असली तरी अपक्ष आणि अन्य छोटय़ा पक्षांना दिलेली चिन्हे एकदम आकर्षक आणि गमतीशीर आहेत. पालिकेच्या रंणागणात इतर काही पक्ष असून त्यात भारिप-बहुजन महासंघ, लोकभारती, आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया, अखिल भारतीय सेना, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतवादी एकता पार्टी, नॅशनल ब्लॅक पँथर, रिपब्लिकन सेना या पक्षांचा समावेश आहे.

संभाजी ब्रिगेडला ‘नारळ’, एमआयएमला ‘पतंग’

संभाजी ब्रिगेड या वादग्रस्त संघटनेला नुकतीच राज्य निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. संभाजी ब्रिगेड प्रथमच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत असून 16 जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. मात्र निवडणूक आयोगाने या पक्षाला निवडणुकीआधीच ‘नारळ’ दिला आहे. तर एमआयएम या पक्षाचे 56 उमेदवार रिंगणात असून त्यांना ‘पतंग’ हे चिन्ह दिले आहे.

27 इतर पक्ष

या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पक्ष अशा प्रमुख 14 पक्षांबरोबर 27 इतर पक्षही निवडणुकीत उतरले आहेत. या छोटय़ा छोटय़ा पक्षांनी तब्बल 251 जागा लढवल्या आहेत.

ही आहेत गमतीशीर चिन्हे

या चिन्हांमध्ये शिवणयंत्र, विजेचा खांब, नगारा, बॅटरी, टॉर्च, शिट्टी, रोडरोलर, दूरदर्शन संच, कॅमेरा, चालण्याची काठी, इस्त्र्ााr अशा वस्तूंबरोबरच कपबशी, गॅस सिलिंडर, काचेचा ग्लास, किटली, पाव, केक अशा स्वयंपाकघरातल्या वस्तूंचाही समावेश आहे. बंगला, कोट, ब्रिफकेस, कात्री, स्टूल, टेबल, छताचा पंखा अशा कार्यालयीन वस्तूंचा समावेश असून अशा सुमारे 50 चिन्हांचे वाटप मुंबई महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आले आहे. यावेळी एकूण 717 अपक्ष लढणार असून त्यांना मोठय़ा प्रमाणावर या चिन्हांचे वाटप झाले आहे. मतदार या चिन्हांना भुलतात की योग्य उमेदवार निवडतात हे मात्र निकालातच समजणार आहे.

‘नाम’चे 7 उमेदवार रिंगणात

नागरिक अधिकार मंच म्हणजेच ‘नाम’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. ‘नाम’ने पाणी, त्यांचा विकास, पर्यावरण, सुक्या कचऱयाची विल्हेवाट लावणे, मुस्लिम महिलांचे हक्क इत्यादी विषयांबाबत आवाज उठवला आहे. मागील वर्षी मे महिन्यात ‘नाम’ने मुंबईतून निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा अनुभव असलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे ‘नाम’चे समन्वयक अमोल मदामे यांनी सांगितले. ‘नाम’च्या उमेदवारांना नशामुक्ती मंडळ, किन्नर माँ ट्रस्ट यांसारख्या स्वयंसेवी संस्थांचाही आपल्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ‘नाम’च्या वतीने पहिल्यांदाच तृतीयपंथी निवडणूक लढवणार आहे.