महापराक्रमी संभाजी महाराज

1124

मिलिंद एकबोटे

देशासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावे आणि देशासाठी कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावेअसे एका प्रखर देशभक्ताने सांगितले होते. शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाच्या प्रचंड आक्रमणाच्या वावटळीत उद्ध्वस्त होऊ नये यासाठी संभाजी राजांनी प्रखर संघर्ष केला. स्वतःच्या बलिदानाने स्वदेश, स्वधर्म यांचे रक्षण केलेछत्रपती संभाजी राजांच्या ३२८व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त

औरंगजेबाने  महाराष्ट्रावर १६८१ मध्ये आक्रमण केले त्यावेळी त्यांच्याकडे आठ लाखांचे प्रचंड सैन्यबळ होते. संभाजी महाराजांकडे मात्र होते फक्त ५० हजार सैन्यबळ, पण ते डगमगले नाहीत, त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी मराठे विरुद्ध मोगल असा तीव्र संघर्ष उभा राहिला. औरंगजेबाचे १६ नामांकित सरदार निरनिराळ्या ठिकाणी स्वराज्यावर चालून आले, परंतु हंबीरराव मोहित्यांच्या सहकार्याने आखलेली शंभू छत्रपतींची व्यूहरचना फसली नाही. शहाबुद्दीनखान, हसनअलीखान, बहादूरखान, कासीमखान किरमाणी, शहाजादा आज्जम, शहजादा मुअज्जम या सर्व नामांकित मोगल योद्ध्यांना संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी धूळ चारली. संभाजी महाराजांचा युद्धातील आवेश आणि उत्साह अवर्णनीय होता. त्यांच्या उपस्थितीमुळे सैनिकांना जोर चढत असे. त्यामुळे संख्येने प्रचंड असलेले मोगल प्रत्येक ठिकाणी असफल ठरले.

साकी मुस्तैद खान या औरंगजेबाच्या दरबारातील लेखकाने एक प्रसंग नोंदवून ठेवला आहे. तो वाचल्यावर संभाजी राजांच्या प्रबळ पराक्रमाची ओळख होते. तो लिहितो तो काळ १६८२ च्या उत्तरार्धाचा आहे. बादशहाला महाराष्ट्रात येऊन दीड वर्ष होऊन गेले होते. त्यावेळी त्याच्या मनात आग्र्याला परतण्याचे विचार चालू होते. संभाजी राजांच्या पराक्रमाच्या वार्ता ऐकल्यामुळे चिडून त्याने आपल्या सर्व सरदारांची एक सभा बोलावली. त्या सभेत सरदारांना उद्देशून तो म्हणाला, ‘दख्खनवर स्वारी करून दीड वर्ष झाले, परंतु अद्यापि हाती काही लागलेच नाही. आपला प्रचंड पैसा खर्च झाला आहे. आता मी आग्र्याला माघारी जाण्याच्या विचारात आहे. तुमच्यापैकी कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारावी’ असे आवाहन त्याने आपल्या सहकाऱ्यांना केले, परंतु कोणीही पुढे आले नाही.

संभाजीराजांच्या पराक्रमाचा धाक प्रत्येकाच्या मनावर होता. बादशहाने आपला लाडका पुत्र आजमशहा याला ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले. पुत्राची स्तुती करताना तो म्हणाला की, ‘तू या कामासाठी सर्वात योग्य सेनानी आहेस’ परंतु त्याने त्याचा मित्र अमीर खान जो अफगाणिस्तानच्या स्वारीवर गेला होता त्याची मदत मागितली. औरंगजेब वैतागला. तो चिडून म्हणाला, ‘दख्खनची खात्री नाहीच’ आणि अफगाणिस्तानची स्वारी सोडून द्यायची म्हणजे दुहेरी नुकसान! त्याला हा प्रस्ताव बिलकूल पसंत पडला नाही. संतप्त झालेल्या औरंगजेबाने भरदरबारात आपल्या डोईवरचा किमाँश सर्व मानचिन्हांसह फेकून दिला आणि प्रतिज्ञा केली. ‘जोपर्यंत संभा जिवंत अगर मृत हाती लागत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमाँश (मानाची पगडी) घालणार नाही!’ पुढे सात वर्षे औरंगजेबाला बोडके राहावे लागले! संभाजी महाराजांच्या भीमपराक्रमापुढे त्याने जणू हात टेकले होते. साकी मुस्तैद खानने त्यावेळेस लिहिले होते की, ‘संभाचा प्रश्न मिटणे शक्य नाही, असे बादशहाचे मत झाले आहे!’ प्रत्येक मराठी माणसाला गर्व वाटावा असा हा शंभू छत्रपतींचा महापराक्रम होता.

शाहीर योगेशांनी शंभूराजांचे वर्णन करताना ‘‘देशधरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराजा था’’ असे शब्द वापरले आहेत. ते किती यथार्थ आहेत हे आपल्याला या हकिकतीवरून लक्षात येईल.

असा शंभूराजांचा महापराक्रम होता. त्यांना आठवायचे म्हणजे शत्रूला कधीही न घाबरणारी त्यांची निर्भयताच आपल्या अंतःकरणात ठसवायची! फितुरीमुळे मोगलांच्या कैदेत सापडलेल्या शंभूराजांनी आपल्या प्रखरतेने शत्रूला निस्तेज आणि निप्रभ करून टाकले. अत्याचारी औरंगजेबाने त्यांना कठोर यातना दिल्या. ३९ दिवस त्यांचे हाल केले, परंतु त्याच्या हाती काहीच लागले नाही. शंभूराजांनी औरंगजेबापुढे शरणागती न पत्करता हिंदू धर्माचा अभिमान दाखवला. त्यामुळे त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र पेटून उठला आणि पुन्हा लढायला सिद्ध झाला! जणू गवताला भाले फुटले आणि घरांचे किल्ले झाले. महाराष्ट्रामध्ये शंभूराजांच्या बलिदानाने क्रांती झाली. संतप्त महाराष्ट्राच्या क्रोधाग्नीमध्ये औरंगजेबाच्या पाशवी महत्त्वाकांक्षा भस्मसात झाल्या. २७ वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर औरंगजेब महाराष्ट्रातच गाडला गेला आणि मराठ्यांचे राज्य प्रखर तेजाने तळपू लागले! आपल्या बलिदानाने शंभूराजांनी महाराष्ट्राला नवजीवन दिले. हा इतिहास ऐकून भारावलेले अटलजी म्हणाले होते, ‘फाल्गुनी अमावस्या को शंभूराजा का बलिदान हुआ मगर उसी दिन से स्वराज्य की नयी प्रतिपदा शुरू हुई.’

जो शंभूराजांची ही तेजस्वी कथा ऐकेल तो जीवनाची लढाई कधीही हरणार नाही आणि देशसेवेमध्ये मागे राहणार नाही ही शंभुचरित्राची फलश्रुती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या