संभाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे बनले ‘आयर्नमॅन’

वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी असलेले पोलिस दलातील पहिलेच ‘आयर्नमॅन’

एमआयडीसी वाळूज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संदीप गुरमे यांनी रविवार, दि. ७ ऑगस्ट रोजी युरोपमधील इस्टोनियामध्ये झालेली ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करीत ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला. जगभरातील अत्यंत कठिण स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा समावेश आहे.

अ‍ॅथलेटच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस पाहणारी ही स्पर्धा फार कमी स्पर्धक पूर्ण करू शकतात. मागील सुमारे दोन वर्षांपासून या स्पर्धेची तयारी करणार्‍या श्री. संदीप पांडुरंगराव गुरमे यांनी कठोर मेहनतीने हे यश मिळविले. त्यांनी ही स्पर्धा 7 तास 44 मिनिटे एवढ्या वेळात पूर्ण केली.

युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे ही स्पर्धा पार पडली. 1.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे हे तीनही क्रीडाप्रकार, साधारण 17 ते 18 अंश सेल्सियस तापमानात एकसलग पूर्ण करावे लागणारी ही स्पर्धा जगातील कठिणतम स्पर्धांपैकी एक समजली जाते. ही स्पर्धा जिंकणे हे तर महाकौशल्याचे काम आहे पण ती पूर्ण करणारे स्पर्धकही खूप कमी असतात.

व.पो.नि. श्री. संदीप गुरमे हे संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे, येथे कार्यरत असून एक सक्षम पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. ते एकेकाळचे गुणवत्ताप्राप्त एनसीसी कॅडेट होते. अ‍ॅथलेटिक्सची त्यांची आवड त्यांनी बालपणापासून जपलेली आहे. निर्व्यसनी व शाकाहारी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री. संदीप गुरमे यांनी विरळ ऑक्सिजन असलेल्या मनाली ४००० फूट उंची ते लेह लडाख खारदूगला १८००० फूट उंचीवर ५५० किमी सायकलिंग २०१९ मध्ये करण्याचा विक्रम नोंदविला आहे.

‘आयर्नमॅन’ स्पर्धेसाठी त्यांनी मागील दोन वर्षांपासून तयारी चालविली होती. वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक श्री. अभिजित नारगोलकर हे श्री. गुरमे यांचे ‘कोच’ आहेत. या स्पर्धेसाठीची शारीरिक व मानसिक तयारी श्री. नारगोलकर यांनी करून घेतली. श्री. गुरमे यांनी सरावादरम्यान दररोज 2 तास मेहनत घेतली. दर आठवड्याला 300 किलोमीटर सायकलिंग, 21 किलोमीटर धावणे आणि 7 किलोमीटर पोहणे हा क्रम त्यांनी मागील वर्षभर सांभाळला.

हवाई बेटांवरील रहिवासी असलेल्या ज्युडी आणि जॉन कोलिन्स यांनी 1974 मध्ये सॅन दिएगो येथे झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावरून प्रेरणा घेत त्यांनी 1977 मध्ये ‘सायकलिंग-रनिंग-स्विमिंग’ हे तीनही क्रीडाप्रकार एकत्र असलेल्या स्पर्धेचे प्रथम आयोजन केले. कुठल्याही अ‍ॅथलिटसाठी स्वप्नवत असलेली, त्यांच्या क्षमतांचा कस लागणारी ही स्पर्धा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. ‘कुठलीही गोष्ट शक्य आहे’ असे ध्येयवाक्य असलेली ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या स्पर्धकाला ‘आयर्नमॅन’ म्हणून गौरवले जाते. दरवर्षी जगभरातून हजारो स्पर्धक यात सहभागी होतात आणि फार कमी ही स्पर्धा पूर्ण करू शकतात.

अशा प्रकारे यश संपादन करणारे महाराष्ट्रातील पहिले वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. त्यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी आयर्नमॅन ७०.३ ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली आहे .

ही कठिण स्पर्धा पूर्ण करणार्‍या श्री. संदीप गुरमे यांचे पाेलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, संदीप यांचे आई-वडील, पत्नी ॲड. रजनी, मुलगा सरल व चिराग, त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रमंडळ, उद्योजक व पोलिस विभागाकडून तसेच वाळूज व एमआयडीसी येथील उद्योजक तसेच पोलिस अधिकारी, अंमलदार व नागरिक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.