न्याय मिळेपर्यंत टेंभापुरी प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार

22

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

प्रकल्पग्रस्तांना जमीन देणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी जमीन देताना जिल्हा प्रशासनाने पात्र -अपात्रतेची यादी तयार करून देणे आवश्यक आहे. मात्र, अशी यादीच बनविली गेली नसल्यामुळे आतापर्यंत फक्त १५ टक्के प्रकल्पग्रस्तांनाच जमीन मिळाली असून, ८५ टक्के प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळालेला नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी निदर्शनास आणून दिले.

टेंभापुरी येथील प्रकल्पग्रस्तांना जमीन, पाणी मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी डॉ. पाटणकर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रकल्प उभारण्यासाठी शेतकरी आपली जमीन देऊन योगदान देत आहेत. त्यांना सामाजिक भावनेतून आणि कायद्यानुसार मदत करण्याची जबाबदार राज्य शासनाची आहे, परंतु ही जबाबदारी पार पाडण्यात प्रशासनाची यंत्रणा कमी पडत आहे, असा आरोप करून डॉ. पाटणकर म्हणाले, प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पग्रस्तांना ११ आणि १३ ची नोटीस देऊन जमिनीसाठी पात्र – अपात्रतेची यादी तयार करणे आवश्यक आहे. परंतु तशी यादीच केली नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळालेला नाही. केवळ १५ टक्केच प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या आहेत. १० टक्केच प्रकल्पग्रस्त युवकांना नोकऱ्या मिळाल्या असून ९० प्रकल्पग्रस्त युवक आजही नोकरीची प्रतीक्षा करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नसल्यामुळे ते न्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत न्याया मिळणार नाही तोपर्यंत टेंभापुरी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चालूच राहील असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पग्रस्त न्यायासाठी जिल्हा प्रशासनाकडे याचना करीत आहेत. परंतु प्रशासन गंभीर नाही, असा आरोप करून पात्र-अपात्रतेची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करणे आवश्यक आहे, ती यादीच केली नसल्यामुळे टेंभापुरीच्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा लाभ मिळाला नाही. तो मिळवून देण्यासाठी हा लढा चालूच राहील, असेही ते म्हणाले.

१९ मार्चपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष सुभेदार मेजर सुखदेव बन यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या