भाजप अध्यक्षांनी ते पुस्तक मागे घ्यावे – छत्रपती संभाजी राजे भोसले

1492

छत्रपती शिवाजी महाराज असामान्य व्यक्तीमत्व होते, अशा महापुरुषाशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपने प्रकाशित केलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घ्यावे अशी मागणी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी रविवारी दिला आहे. 422 व्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले बोलत होते. रयतेचे राजे असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. संबधित पुस्तकामुळे सध्या वादंग निर्माण झाला आहे. त्या पाश्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी हे पुस्तक मागे घेण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

मानाचा विश्वभुषण पुरस्कार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पुरुषोत्तम खेडेकर, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते देण्यात आला. कौन बनेगा करोडपती विजेता बबिता ताडे यांना माँ साहेब जिजाऊ पुरस्कार, मराठा कला भुषण पुरस्कार प्रणाली घोगरे यांना, मराठा कृषी भुषण पुरस्कार पांडुरंग डोंगरे यांना पुरुषोत्तम खेडेकर, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याहस्ते देण्यात आला.

मराठा सेवा संघाने आपल्याला मराठा विश्वभूषण पुरस्कार दिला. मात्र, आपण पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही, असे संभाजीराजे म्हणाले. त्यामुळे हा पुरस्कार का स्वीकारावा असा प्रश्न पडला होता. मात्र, शिवाजी महाराज आणि शाहू, फुलेंचे विचार आपण जपतो. त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांच्या केवळ रक्ताचा नव्हे तर विचारांचा वारसा आपण जपत असल्यामुळे हा पुरस्कार स्वीकारल्याचे ते म्हणाले. शिवशाहू दौरा राज्यात आपण पूर्ण केला. त्याचे श्रेय मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांना जाते. या माध्यमातूनच आपली खरी ओळख जनमासाला झाली.त्यामुळे हा पुरस्कार अशा सर्वसामान्य व्यक्तींना समर्पीत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या