
संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळाच्या राज्यस्तरीय जाखडी नृत्य स्पर्धेत भैरवनाथ प्रासादिक नाच मंडळ तुरेवाडी मंडणगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर श्री काळभैरव नृत्य कला पथक कालसुरी म्हसळा द्वितीय, जय हनुमान नृत्य कला पथक मूर माणगाव तृतीय, भैरवनाथ नृत्य कला पथक तुळशी गणेशवाडी मंडणगड चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत सव देऊळ वाडी, सव उगवतीवाडी, सवाद, भेळेवाडी नवोशी, शेनाळे, उसरघर येथील कला पथकांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मोहित केले. उत्तरोत्तर वाढलेल्या या स्पर्धेची रंगत अंतिम टप्प्यात अटीतटीची झाली. सर्वाधिक एकूण गुण प्राप्त करणाऱ्या सादरीकरणाला त्या त्या विभागातील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
सुमधुरता, तालबद्धता, सुरमय आवाज, पाय थिरकायला लावणारे ढोलकी वादन आणि शब्द संपदा दर्शवणारी काव्य रचना आपला ठसा उमटविणाऱ्या ठरल्या. यामध्ये स्पर्धेतील लक्षवेधी कला पथक अमर नृत्य कला पथक करंजखोल ता. महाड, शिस्तबद्ध कला पथक पेणजाई नृत्य कला पथक पेण ता. माणगाव यांना सन्मानित करण्यात आले तसेच सर्वोत्कृष्ट गायक उदयकुमार नाकती (कालसुरी), सर्वोत्कृष्ट कवी संतोष भात्रे (मुर), सर्वोत्कृष्ट ढोलकी वादक सिद्धेश धाडवे (तुरेवाडी), सर्वोत्कृष्ट कोरस कल्पेश शिगवण, प्रशांत नाकती (तुरेवाडी) यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून मंडळाचे अध्यक्ष रमेश घडवले, उपाध्यक्ष विद्यानंद अधिकारी, सुधीर महाडिक यांनी काम पाहिले. स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र म्हात्रे, प्रल्हाद शिरशिवकर, मिलिंद लिंगायत, नितीन लांबे, डॉ. श्रीधर बाम, अजित लाड, रामदास वारीक, शिवराम पोटले यांनी केले. विजेत्यांना प्रथम 15 हजार, द्वितीय 11 हजार, तृतीय 5 हजार, चतुर्थ 3 हजार व प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह, ढोलकी, प्रशस्तीपत्र, मेडल, सहभाग पत्र देवून गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक कला संचातील एका नृत्य कलाकाराला लक्षवेधी नृत्य कलाकार म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले.