समीरच्या आजोबांची बाग

86

>>संजीवनी सुतार<<

उन्हाळ्याची  सुट्टी पडली आणि समीर आजोळी गेला. आजोळी आजी होती, मामा-मामी होते. मामेभाऊ शिरीष, मामेबहीण निशा होती. आजोबा मात्र नव्हते. काही महिन्यांपूर्वी समीर-शिरीष-निशाचे आजोबा देवाघरी गेले होते. आजोळी येताच समीरला आजोबांची कमतरता जाणवली. तो धावत घराच्या परसात गेला. तिथे जिकडे पाहावं तिकडे आजोबांची हिरवीगार आठवण दाटली होती. आजोबांनी लावलेली आंबा, जांभूळ, फणस वगैरे झाडं उंच वाढली होती. काही झाडं मोहोरली होती, तर काहींवर फळं धरली होती. पानांआडून ती इवली-इवली फळं डोकावून भोवतालचं जग पाहत होती, आजोबांच्या कडेवर बसून बाळ कुतूहलानं आजूबाजूच्या जगाकडं पाहतं नं तश्शी!

जास्वंदीच्या रोपटय़ांवरून लाल-गुलाबी फुलांची झुंबरं लोंबत होती. मोगऱयाच्या कळ्या दरवळू लागल्या होत्या. जाईजुईचे आणि मधुमालतीचे वेल गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी उंचावर गेले होते. आजोबा आता असते तर आपल्यालाही, ‘पाहू बरं किती उंच झालाएस ते?’ असं आपल्यालाही म्हणाले असते, समीरच्या मनात आलं. गुलाबाच्या ताटव्यात तर रंगांच्या इतक्या छटा होत्या की, ‘हे खरे गुलाब आहेत की कागदी हो आजोबा?’ असं नकळत समीर विचारणार होता.

समीरला आठवलं, सुट्टीत आजोळी आलं की आजोबा सगळ्या नातवंडांना घेऊन परसात झाडाखाली बसायचे, गोष्टी सांगायचे. त्यांच्या गोष्टीत झाडावर घरटी बांधणारे चिऊ-काऊ असायचे, जांभळीच्या फांद्यांवरून उडय़ा मारीत जांभळे चाखणारी माकडे असायची, आंब्यांच्या झाडाखाली आमरसाची मेजवानी झोडणारे बगळे असायचे आणि द्राक्षांच्या वेलीजवळ उडय़ा मारून द्राक्षांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणारे कोल्हे असायचे. कधी कधी त्यांच्या गोष्टीत लाकूडतोडय़ा यायचा. तो झाडं तोडायचा आणि सरपण म्हणून विकायचा. झाडं तोडल्यामुळे दुष्काळ पडायचा आणि लाकूडतोडय़ाला उपास घडू लागायचे. मग आजोबा पुढे सांगायचे, ‘ही झाडं, या वेली म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे बरं का बाळांनो! झाडं दमल्या-भागल्या वाटसरूला थंडगार सावली देतात. गोड फळं देतात. पक्षी झाडांवर आपली घरकुलं सजवतात. झाडांमुळे पक्ष्यांना निवारा मिळतो. पक्षी इकडून तिकडे जाताना फुलांतले परागकण नेतात, बिया नेतात आणि नवी झाडं रुजवायला मदत करतात. झाडं उंच वाढली की पाऊस पडतो. शेतं पिकतात. माणसं सुखी होतात. नुसत्या फुला-फळांनी बहरलेल्या वेली, झाडं दिसली तरी मनाला किती आनंद होतो! म्हणून झाडं लावायला नकोत का? गरज असेल तेव्हा एक झाडं तोडलं तर दुसरं लावलं पाहिजे.’ परसात समीरला आजोबा भेटल्यासारखंच वाटलं.

बघता बघता सुट्टी संपली. समीरला महिना कसा संपला कळलं नाही. मुंबईला परतायचं त्याच्या जीवावर आलं होतं. तो आजीला म्हणाला, ‘आजी, आजोबांनी लावलेल्या झाडांची मला मुंबईत खूप खूप आठवण येईल. मी इथंच राहू का गं?’
आजीनं प्रेमानं समीरची पापी घेतली आणि म्हणाली, ‘आजोबांच्या झाडांनाही तुझी आठवण येईल; पण तुझी शाळा तर मुंबईत आहे. तुझे आई-बाबा तिथे आहेत. आई-बाबांना तू आपल्या झाडांचे आंबे नेणार ना?’ समीरला आजीचं म्हणणं पटलं. त्यानं मान डोलावली; पण मग त्याच्या मनात एक कल्पना आली. तो पटकन म्हणाला, ‘आजी, त्या आंब्यांच्या कोयी मी मुंबईतल्या आमच्या कॉलनीत लावीन. मग आजोबांच्या बागेसारखी आमची मुंबईही हिरवीगार होईल नाही का गं? म्हणजे एकप्रकारे आजोबाच माझ्याबरोबर मुंबईत असतील… हो ना?’

समीर असं म्हणताच आजीला गहिवरून आलं. तिनं समीरला छातीला कवटाळलं.

 

आपली प्रतिक्रिया द्या