सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, उच्चभ्रू सोसायटीमध्ये समोसा पार्टीचे आयोजन; दोघांना अटक

2099

कोरोना फैलावू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक मुंबईकर कोरोनाचा फैलाव होऊ नये ही आपली जबाबदारी आहे असे मानून सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. मात्र काही मुंबईकर हे लॉकडाऊन आणि सरकारी सुचनांना बिनधास्तपणे धाब्यावर बसवत आहेत. घाटकोपरमधल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 14 मे रोजी म्हणजेच गेल्या मंगळवारी समोसा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं अजिबात पालन न करता मोठ्या प्रमाणावर लोकं जमली होती. मास्क, ग्लोव्हज न घालता बाहेर पडलेल्या इथल्या रहिवाशांनी इमारतीच्या आवारात चटणीसह समोसे फस्त केले. इथले काही रहिवासी हातात प्लेट घेऊन रस्त्यावर उभे राहून गप्पा मारताना दिसत होते. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी इथल्याच काही रहिवाशांनी स्पीकर लावून गिटारच्या तालावर गाणीही म्हटली. सजग नागरिकांनी या सगळ्या प्रकाराचे फोटो काढून पोलिसांपर्यंत पोहोचवले तसेच सोशल मीडियावरही व्हायरल केले.

याबाबतची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या सोसायटीच्या अध्यक्षाविरोधात तसेच समोसा पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पंतनगर पोलिसांनी या समोसा पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी सोसायटीचा अध्यक्ष राहुल संघवी आणि पार्टीचा आयोजक जेठालाल देढिया यांना अटक केली आहे. या दोघांची जामिनावर सुटकाही झाली असल्याचे कळाले आहे.

कुकरेजा पॅलेस नावाच्या सोसायटीमध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. संघवी आणि देढिया यांच्याविरोधातील कारवाई ही चुकीची असल्याचं त्यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी म्हटलंय. त्यांनी दावा केलाय की जमलेली लोकं काही मिनिटांमध्ये आपापल्या घरी गेली होती. गाणी ही लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हटली गेली आणि खाण्यापिण्याचे पदार्थ हे सोसायटीमधल्या लोकांसाठी नव्हते तर ते पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी होते. या मजुरांना खाणं पिणं दिल्यानंतर समाजसेवा करून परतलेली मंडळी उपाशी होती आणि त्यांनी मजुरांसाठी आणलेले खाद्यपदार्थ वाटून खाल्ले.

मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मंगळवारी पंतनगर भागात कोरोनाचे 724 रुग्ण सापडले आहेत. या भागत सोशल डिस्टन्सिंग आणि इतर निर्बंध अजिबात पाळले जात नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहेत. इथल्या इमारतींमध्ये लोकं पार्ट्या करतात बिनधास्तपणे बाहेर फिरतात असं तक्रार करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या