आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे फलित

182

प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे

डोंबिवलीत ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ झाले आणि कल्याणात ‘समरसता’ संमेलन पार पडले. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्येच आंबेडकरवादी मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे यांनी घेतलेला संमेलनाचा हा आढावा…

आंबेडकरवादी साहित्याचे प्रयोजन जगाची, समाजाची, व्यक्तीची पुनर्रचना करण्याचे आहे. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात Reconstruction of society समाजाच्या पुनर्रचनेचा विचार ‘धम्मा’चे स्वरूप स्पष्ट करताना मांडला आहे. त्याचा आधार घेत आंबेडकरवादी साहित्य पुनर्रचनेचे, नवनिर्माणाचे उद्दिष्ट साध्य करीत मानवी समाजाची वैचारिकता, मानसिकता बदलण्याचा प्रयत्न विविध वाङ्मय प्रकारांच्या सहाय्याने करीत आले आहे. या सकारात्मक व व्यापक भूमिकेने जातीअंत होऊ शकतो, अनेक जाती तुटू किंवा नष्ट होऊ शकतात, काही धर्म त्यांच्या आदर्शांना मानवी पातळीवर पाहू शकतात, दैवतीकरणाचा धोका टाळून लोकशाही समाजवादी व्यवस्थेला सुसंगत धर्मव्यवस्था करू शकतात. या सर्व प्रक्रियेत सर्व धर्म साहित्य प्रवाह आणि छोटे-मोठे सवते साहित्य प्रवाहसुद्धा आपल्या मूळ परिवर्तनवादी भूमिकेशी पुन्हा जोडले जाऊ शकतात याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आंबेडकरवादी साहित्य संमेलनावर येऊन पडली होती. त्यासोबतच परिवर्तनाच्या मार्गाने जाणाऱया सर्व प्रवाहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे केंद्रवर्ती वैचारिक नेतृत्व प्रेरित करीत मार्गदर्शन करीत राहील हे ठळकपणे सांगणे आवश्यक होते. तेच आंबेडकरवादी साहित्याने संमेलनानिमित्ताने केले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनवाले घटक अद्यापही सरस्वती, नटराजन पूजन आणि पारंपरिक विचारव्यूहाच्या पलीकडे जायला तयार नाहीत. या संमेलन तुकडय़ा आजही वैचारिकदृष्टय़ा एकमेकांच्या विरुद्धच उभ्या आहेत. सर्व स्वतंत्र प्रवाहांना आपली स्वतंत्र परंपरा आहे. अखिल भारतीय विचारधारा वर्णवर्चस्वाखालीच राबते आहे. तिचे ‘मराठी रूप’ अद्यापि दिसत नाही. मराठीकेंद्री भूमिका घेतली तर मराठी समाजातील सर्व प्रवाहांना एकत्रित घ्यावे लागेल. मराठी समाजमनात समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी असे किती तरी प्रवाह वैचारिक प्रेरणा देत आले आहेत. यांना समोर ठेवून ‘अखिल भारतीय’ घटकाने नवी व्यापक भूमिका स्वीकारून नवे प्रवाह व विचारकेंद्री स्वरूप आपल्या भूमिकेला द्यावे हेही अधोरेखित करणे आवश्यक होते. जोवर दोन घटकांत वैचारिक मतभेद आणि संघर्ष आहे तोवर हे घटक एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गरज म्हणून एकत्र आले तरी त्यांचे प्रत्येकाचे अस्तित्व अबाधित अन् वेगळेच राहणार हे त्रिकालबाधित सत्य आहे.

‘समरसते’चा विचार हा अपूर्ण अन् मागास विचार आहे. १९३६ ची मानसिक स्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘जाती निर्मूलना’ची भूमिका मांडताना स्पष्ट केली आहे. तेव्हाचे गांधीजीप्रणीत ‘सहभोजना’चे कार्यक्रम अन् संघप्रणीत ‘समरसता’ विचार यात तत्त्वतः काहीच फरक नाही. ‘अस्पृश्यता’ अन् ‘जातीयता’ या मुद्दय़ांना नीटपणे समजून न घेता दोन्ही बाबी समान आहेत असे मानून या चुकीच्या व अपूर्ण संकल्पना जन्माला आल्या आहेत. आजच्या समाजवास्तवात खूप जळते प्रश्न आहेत. सांस्कृतिक दहशतवाद, अन्याय-अत्याचार याबाबत समाजातील सर्वच थरांतील लोकांमध्ये कमालीची आहे. महाराष्ट्र शासन अनेकदा प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. समाजातील अन्यायग्रस्तांना, भयग्रस्तांना दिलासा मिळावा असे कोणत्याही संबंधित घटकाकडून घडत नाही, सूचित होत नाही. अशा पार्श्वभूमीवर तरुणांत व साहित्यिक, अभ्यासक यांच्यात सकारात्मक संवाद व्हावा यादृष्टीने सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक समस्यांना कवेत घेऊन त्यावर प्रकाशझोत टाकणारे परिसंवाद संमेलनात जाणीवपूर्वक आयोजिले गेले. ‘आंबेडकरोत्तर वैचारिक साहित्याचा प्रवाह’ या परिसंवादात डॉ. मिलिंद कसबे, डॉ. प्रदीप गांगुर्डे आणि प्रा. राहुल चव्हाण यांनी नेमकी चर्चा केली. ‘भारत देश’ अन्यायमुक्त, दहशतमुक्त कसा होईल? या विषयाला अॅड. बी. जी. बनसोडे यांनी पुरेपूर न्याय दिला. जागतिक दहशतवाद आणि राज्यातील दहशतवाद यांची सांगड घालीत वेगवेगळय़ा प्रकारचे ‘टाडा’, ‘पोटा’, ‘मिसा’ इ. कायद्यांचा ऊहापोह आणि गैरवापर यांची चर्चा करीत ‘भारतीय राज्यघटनेचे जतन’ करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला. संतोष कुंभार व सुनील जगताप यांनी चर्चेत भर घातली. आंबेडकरी साहित्यातील ‘स्त्रीप्रतिमा’ उलगडून दाखवण्याचे काम प्रा. अलका शिंदे पवार, रोहिणी जाधव यांनी अतिशय प्रभावीपणे केले. ‘आंबेडकरवादी विचारांच्या राजकारणाची स्थिती-गती’ मांडताना अॅड. विलास धनगर, शैलेश दोंदे यांनी घणाघाती टीका केली, तर पत्रकार मधू कांबळे यांनी राजकीय स्थिती-गतीला समाजव्यवस्था जबाबदार असल्याचे प्रतिपादन करून संपूर्ण विषयाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली. साहित्य संमेलन हा केवळ प्रतिभावंतांचा सोहळा न होता तो वाचकांचा, सर्वसामान्य जनतेचा उत्सव व्हावा अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. या भूमिकेला धरून सामान्य जनतेच्या पसंतीचे, प्रबोधनाचे कलाप्रकार सादर केले गेले. संभाजीनगरच्या मीराबाई उमाप यांनी ‘आंबेडकरी भारूड’ सादर केले. नागपूरचे अशोकभाऊ सरस्वती यांनी ‘आंबेडकरी कीर्तन’ सादर केले, तर मुंबई-कल्याणमधील संगीतकार-गायक दत्ताजी जाधव गुरुजी यांनी क्रांतिकारी गीत-गझलांचा अत्यंत उद्बोधक कार्यक्रम सादर केला. सुनील जगताप, गौतम सोनवणे, भास्कर शिंदे, विजय बनकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली. समारोपाच्या सत्रात ११ ठराव पास करण्यात आले.१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत ‘दलित’ऐवजी ‘आंबेडकरवादी साहित्य’ असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा.
८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये. या ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली. समारोपाच्या कार्यक्रमात आठवले यांनी कोणतीही कविता न सादर करता अतिशय समयोचित गांभीर्याने विचार मांडले. चहूबाजूंनी पराभूत होत असलो तरी बौद्धिकदृष्टय़ा आंबेडकरी समाज कधीही पराभव पत्करणार नाही हा संदेश आंबेडकरीय साहित्य संमेलनाने बुद्धभूमी, कल्याणमधून महाराष्ट्रभर पोहोचविला असे म्हणता येईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या