सॅमसंग कंपनीविरुद्ध मोबाइल विक्रेत्यांचा देशव्यापी एल्गार, 3 दिवस खरेदी विक्री बंद

2453

ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून सॅमसंगतर्फे राबविण्यात येणाऱ्या चुकीच्या धोरणांविरोधात ‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन’च्या पुढाकाराने एल्गार पुकारण्यात आला. सर्व मोबाइल विक्रेत्यांनी दिनांक 11, 12 व 13 फेब्रुवारी रोजी सॅमसंग मोबाईलची खरेदी, विक्री व पेमेंट 100 टक्के बंद ठेवून सॅमसंगवरती देशव्यापी बहिष्कार घातला. या आंदोलनाचा एक भाग म्हणून नगरमधील विक्रेत्यांनी गुरूवारी दुपारी 12 वाजता वाडिया पार्क येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सॅमसंगच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सॅमसंग जिल्हा वितरक व कंपनी अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, अजित पवार, संतोष बलदोटा आदी व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

अॅमेझॉन-फ्लिपकार्ट यासारखे ऑनलाईन स्टोअर्स मार्केटमध्ये आल्यापासून गाव आणि शहरातील स्थानिक बाजारपेठेवर याचा गंभीर स्वरूपाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन’च्या माध्यमातून गेली 6 महिन्यापासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट विरोधात राष्ट्रीय स्तरावर ‘अॅमेझॉन-फ्लिपकार्ट हटाव, देश बचाव’ हे आंदोलन छेडण्यात आले. या दोन्ही कंपन्या परदेशी असून फक्त दलालीच्या नावाखाली अब्जावधी रुपयांची लूट सरकारच्या नजरेसमोर परदेशात नेत आहेत. ग्राहकांच्या दुष्काळामुळे स्थानिक बाजारपेठा ओस पडल्या असून व्यापाऱ्यांवर कर्जबाजारी होऊन भिकेला लागण्याची वेळ आलेली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

तसेच सॅमसंग कंपनी आता व्यापाऱ्यांच्याच मुळावर उठलेली दिसते. येथून पुढील काळात सॅमसंग कंपनी अॅमेझॉनच्या साथीने आपला व्यवसाय करणार आहे. याला सर्व व्यापारीवर्गाचा कडाडून विरोध आहे. सॅमसंग कंपनी आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या