सॅमसंग मोबाईलचा चीनला ठेंगा, हिंदुस्थानात करणार 5 हजार 367 कोटींची गुंतवणूक

4090

जगभरात कोरोनाचा प्रसार करूनही मुजोर वागणाऱ्या चीनला आता त्याची फळे भोगावी लागत आहेत. अनेक विदेशी कंपन्यांप्रमाणे आता मोबाईल फोन जायन्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाच्या सॅमसंग मोबाईलने चीनमध्ये आपला प्रकल्प ना उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी सॅमसंग आता हिंदुस्थानातील उत्तरप्रदेशात स्मार्टफोन डिस्प्ले बनविण्याचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी 5 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कोरियन कंपनी करणार आहे. यासंदर्भातील करारांवर 2019 च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

कंपनीला आकर्षक कर सवलती आणि इतर सोयी सुविधा देण्यात आल्याने सॅमसंगने हिंदुस्थानला पसंती दिल्याचे सांगण्यात येत आहे. सॅमसंगच्या कारखान्याच्या माध्यमातून 1300 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. इनव्हेस्ट इंडिया या मध्यस्थी करणाऱया आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचं काम करणाऱया खात्याने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा रॉयटर्सने हवाला दिला आहे. हा प्रकल्प 2021 पासून सुरु होणार आहे.

सॅमसंगने केलेली ही गुंतवणूक हिंदुस्थानसाठी फायद्याची ठरु शकते. त्यातही स्मार्टफोन कंपन्यांना आकर्षित करण्याच्या स्पर्धेमध्ये मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या व्हिएतनामऐवजी सॅमसंगने हिंदुस्थानला प्राधान्य दिल्याने या कराराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
– सतीश महाना, उत्तर प्रदेशचे औद्योगिक विकास मंत्री

आपली प्रतिक्रिया द्या