सांगलीत भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप खासदाराच्या निशाण्यावर माजी आमदार

सांगलीमध्ये भाजपच्या खासदार आणि भाजपच्या माजी आमदरामध्येच जुंपल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयकाका पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. भाजप नेते विलासराव जगताप विकृत बुध्दीचे आहेत, अशी जहरी टीका खासदार संजयकाका पाटलांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर देखील संजयकाका पाटलांनी निशाणा साधला आहे. विशाल पाटील म्हणजे माझ्यासाठी अदखल पात्र आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याविषयी तक्रार करणार असल्याचेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे, सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याआधी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांनी जिल्ह्यासाठी कोणताही निधी आणला नाही, असा आरोप केला होता. यावर खासदार पाटील यांनी विशाल पाटील माझ्यासाठी अदखलपात्र आहेत, त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ, आता ती वेळ नाही, अशा शब्दात टीका केली.

तर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजयकाका विंचू आणि खेकड्याच्या वृत्तीचे आहेत. तसेच त्यांच्या वागण्यात बदल देखील होणार नाही अशी टीका केली होती. यावर विकृत झालेल्या बुद्धींच्या मध्ये कशाला लक्ष घालायचं, अशा शब्दात खासदार पाटील यांनी पलटवार केला. विरोधकांना योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ, दखल घ्यायची तेव्हा घेऊ, मी उत्तर द्यायला कुणाच्या बापाकडून २ रुपये खाल्ले नाहीत त्यामुळे उत्तर द्यायला वेळ का घालवायचा, असे संजयकाका पाटील म्हणाले.