संगमेश्वरच्या तरुणाने केळी लागवडीतून साधली आर्थिक उन्नती, वर्षभरात मिळाले चांगले उत्पन्न

डोंगर उतारावर असणारी जागा, जंगली प्राण्यांचा होणारा त्रास यावर कल्पकतेने मात करत संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील युवा आणि प्रयोगशील शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी गतवर्षी केलेल्या केळी लागवडीतून त्यांना आता समाधानकारक उत्पन्न मिळू लागले आहे. आठवड्याला किमान 100 डझन केळ्यांचे उत्पन्न मिळू लागल्याने जिद्द , चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मकरंद मुळ्ये यांनी आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला आहे . सध्या श्रावण महिना असल्याने आणि त्यानंतर गणेशोत्सव येत असल्याने गावठी केळ्यांना असणारी मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे .

कष्ट केले तर त्याचे फळ नक्की मिळते. मात्र, फळ मिळायला हवे असेल तर आधी कष्ट करायला हवेत. निसर्गात झालेल्या पर्यावरणीय बदलांमुळे पिकांना आणि विविध शेतमालाला फटका बसतोय, हे जरी खरे असले तरीही प्रयत्न करीत राहायलाच हवे, या उक्तीप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी यावर्षी आपल्याच जागेत गतवर्षी तब्बल 200 गावठी केळींची लागवड करून केळी उत्पादनाचा अभिनव प्रयोग केला आहे.

मौजे असुर्डे या दुर्गम गावात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या आधारावर मकरंद मुळ्ये दरवर्षी मिरची, चवळी, पावटा, भुईमूग, पालेभाज्या, भेंडी, वांगी यांची लागवड करतात. या सर्व शेतमालाला संगमेश्वर ही एक मोठी बाजारपेठ असली तरीही मुळ्ये यांनी असंख्य खासगी ग्राहक जोडून ठेवले असल्याने त्यांना बाजारपेठेत मोठ्या भाजी विक्रेत्याकडे कमी दरात आपला शेतमाल विकण्याची वेळ येत नाही. विविध प्रकारची भाजी संगमेश्वर बाजारपेठेत येईपर्यंत वाटेतच संपत असते असा मुळ्ये यांचा अनुभव आहे.

भाजीपाल्याबरोबरच सुपारीचे उत्पादनही ते समाधानकारक घेत असून, ठिबक सिंचनद्वारे मुळ्ये यांनी पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्यावर फळबाग फुलविता येईल, या हेतूने मुळ्ये यांनी गतवर्षी सुमारे 200 केळींची लागवड केली. यासाठी त्यांनी घरी असणाऱ्या जुन्या केळींमधूनच या रोपांची निर्मिती केली. गावठी केळ्यांची जात उत्तम असल्याने त्यापासून तयार झालेली रोपे घेऊन लागवड केल्याने खर्चही कमी झाला. या रोपांना सेंद्रिय खते आणि पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याने रोपांची वाढ उत्तम झाली आहे. गावठी केळ्यांना 60 ते 70 रुपये डझन एवढा दर मिळत असल्याने आपल्याला केळी विक्री करण्याची चिंता नसल्याचे मकरंद मुळ्ये यांनी विश्वासाने सांगितले.

गत आठवड्यात एकाच वेळी तोडलेल्या घडातून आपल्याला 57 डझन केळी मिळाली. केळ्यांचे घड हे एकापाठोपाठ एक असे तयार होत असल्याने आठवड्याला हे उत्पादन 100 डझन पर्यंत देखील पोहचते. सण उत्सव नसतील तर डझनला 50 रुपये आणि हंगामात हाच दर 60 रुपये होतो. केळ्यांसह अन्य भाजीपाला विक्रीसाठी आता आपण व्हॉटस ॲप ग्रूप तयार करणार असून सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला अधिक उभारी देणार असल्याचे युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी ‘सामना’ जवळ बोलताना सांगितले.

ग्राहकांकडून मोठी मागणी

संगमेश्वर आठवडाबाजार येथे किराणा आणि जनरल स्टोअर्स चालवणारे युवा व्यापारी अमोल शेट्ये यांच्याकडे मकरंद मुळ्ये यांच्या बागेतील केळ्यांना मोठी मागणी असते. दिवसभरात दहा ते पंधरा डझन केळ्यांची विक्री आपण आपल्या दुकानात करत असतो. याबरोबरच त्यांच्या बागेतील गावठी नारळ, भाजी यासाठी ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे अमोल शेट्ये यांनी सांगितले. आपण देखील या मालाच्या विक्रीसाठी सोशल मिडियाचा वापर करत असल्याचे अमोल शेट्ये यांनी सांगितले.