24 हजारांपेक्षा जास्त चाकरमानी संगमेश्वरात दाखल, गावकऱ्यांनी गावातच उभारले ‘क्वारंटाईन होम’

1419

शासनाने विविध भागात अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली. ही परवानगी मिळाल्यानंतर विविध भागातून तब्बल 24 हजार 911 जण संगमेश्वर तालुक्यात पोहोचले आहेत. यामुळे इथल्या आरोग्य व महसूल विभागाची पुरती तारांबळ उडाली आहे. खासगी वाहनांनी या चाकरमान्यांनी तालुक्यात प्रवेश केला आहे. या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ संक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या संगमेश्वर तालुक्यात 1 हजार 648 जण घरातच विलगीकरणात आहेत तर संस्थात्मक विलगीकरणात 563 जणांना ठेवण्यात आले आहे. संगमेश्वरात इतर जिल्हे, राज्यातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे.

संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांचे रहिवासी निरनिराळ्या कारणांसाठी जिल्ह्याबाहेर गेले होते. ते मोठ्या संख्येने परतायला लागल्याने त्यांना विलगीकरणात कसे ठेवायचे असा प्रशासनाला प्रश्न पडला आहे. यावर संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये सुतारवाडीच्या ग्रामस्थांनी एक उपाय शोधला आहे. त्यांनी एकत्र येत गावामध्येच एक ‘क्वारंटाईन होम’ उभारलं आहे. रवी केशव सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी गावातच मुंबईकरांसाठी हे स्वतंत्र घर उभारले आहे. इथल्या ग्रामस्थांनी पदरमोड करत अत्यल्प खर्चात, श्रमदानाने या घराची उभारणी केली. यात दोन स्वतंत्र कुटुंब राहू शकतील इतकी जागा आहे. टॉयलेट, बाथरूमसाठी शोषखड्डाही खणला आहे. घराच्या चौथाऱ्याला बाहेरून चिरा लावला आहे आणि वरून ताडपत्री टाकून पावसापासून बचावही केला आहे. वीज जोडणी, चार्जिंग पॉइंट हे देखील काळाच्या गरजेनुसार पुरवण्यात आले आहे. हे क्वारंटाईन होम उभारत त्यांनी संपूर्ण राज्यासमोर गावात परतणाऱ्यांची विलगीकरण सोय व्हावी यासाठी एक मॉडेल प्रकल्प मांडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या