चोरांना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन, पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरा येथे जबरी चोरी झालेल्या सिद्दीकी यांच्या घराला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. कांजिवरा येथे 9 जुलै 2021 रोजी पहाटे देवरुख पोलीस ठाणे हद्दीत चार अनोळखी चोरट्यांनी सुमारे एकुण 5,38,100 रु.किंमतीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट चोरून नेला होता. नुरुल होदा मशहुरअली सिद्दीकी यांच्या घरात ही चोरी झाली होती.सिद्दीकी यांच्या घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे उचकटून टाकत चोर घरात घुसले होते. चोरांनी सिद्दीकी दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवत घरात चोरी केली होती.

सिद्दीकी यांच्या घराची पाहणी करण्यासाठी आणि गुन्ह्यासंदर्भातील तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग शनिवारी सकाळी आले होते. गर्ग यांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने मार्गदर्शक सुचना केल्या आहेत . गुन्हा तात्काळ उघडकीस येण्याचे दृष्टीने विविध पथके तयार करण्यात आली असून सदर पथके तपासासाठी रवाना झाल्याची माहिती पोलीसांनी दिली .

संगमेश्वर कोंड असुर्डे येथे श्रीराम मंदिरात चोरी

संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील श्री राम मंदिराचा दरवाजा फोडून व लॉकर उचकटून सोन्या चांदीचे व पितळीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 48,300 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना गुरुवार दिनांक 8 व शुक्रवार दिनांक 9 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. या चोरीमध्ये सोन्याच्या दोन वाट्या, मणी-मंगळसूत्र, कमर पट्टा, मुकुट, चांदीच्या दोन वाट्या, पंचपाळ, चांदीची कोयरी, पितळी मुकुट व दानपेटीतील सहा हजार रुपये असा ऐवज अज्ञाताने लंपास केला. याबाबतची फिर्याद अनिल गोविंद ढोल्ये (पुजारी, 60, रा. कोंड असुर्डे ) यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर भादंवि कलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या हेड कॉन्स्टेबल श्रीमती व्ही. व्ही. कोष्टी व आर. एच. सोळंके करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या