भैरवगड यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातगाव मंडळाचा निर्णय

सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमेवर असणा-या भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात पाडव्याच्या आदल्या दिवशी (12 एप्रिल) होणारी पूर्वनियोजीत वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करत असल्याची घोषणा भैरवगड सातगांव मंडळाने केली आहे. या यात्रेला रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सातगांव मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र पोलीस अधिक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर परंपरा खंडीत होवू नये म्हणून प्रमुख मानक-यांच्या उपस्थितीत भैरवनाथाची पुजा करण्यात येणार असल्याची माहिती भैरवनाथ सातगांव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भैरवगडावर भैरवनाथाचे मंदीर आहे. या मंदीरात हिंदु रितीरिवाजानुसार अनेक छोटे-मोठे कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी सोयीसुविधा नसताना देखील अनेक पर्यटक हजेरी लावतात. पाडव्याच्या आदल्या दिवशीच्या यात्रेला अनन्य महत्व असते. या यात्रेला महाराष्ट्रातून अनेकजन हजेरी लावतात मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियोजीत यात्रा रद्द करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.मोहीत कुमार गर्ग यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सुचना भैरवगड सातगाव मंडळाला दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी भैरवगडावर अनावश्यक प्रवेश करु नये असे आवाहन भैरवगड सातगांव मंडळाने केले आहे.

भैरवगड सातगाव मानकरी मंडळात रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी, रातांबी,गोवळ,पाते, मजुत्री तर सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज व गावडेवाडी या गावांचा समावेश आहे.

‘सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस दल आणि इतर विभाग दिवसरात्र काम करत आहेत. अशावेळी सर्व भाविकांनी शासनाला आणि पोलिस दलाला सहकार्य करत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.भैरवगड येथील मंदिरात होणारी पुजा ही फक्त पुजा-यांनी करावी त्या ठिकाणी गर्दी करू नये. रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भैरवगडावर गर्दी करु नये त्या ठिकाणी जाणे टाळावे.’

डॉ. मोहीत कुमार गर्ग, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक

आपली प्रतिक्रिया द्या