माहुली घाटात 70 फूट खोल दरीत कार कोसळली, तिघे तरुण बचावले

60 ते 70 फूट खोल दरीत कार कोसळल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात रविवारी सकाळी घडली आहे. कार पाचवेळा उलटूनही केवळ दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघे तरुण बचावले आहेत.

मितेश कथेरीया, स्नेहल पोकीया, भार्गव रामोलीया (रा. गुजरात) अशी बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. गुजरात येथील मितेश कथेरीया, स्नेहल पोकीया, भार्गव रामोलीया हे तिघे तरुण कारने देवदर्शनासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने भीमाशंकरला जात होते. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास माहुली घाटातून जात असताना चालकाला अंदाज न आल्याने कार महामार्ग सोडून थेट 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार उलटली त्याठिकाणी मोठमोठे दगडही आहेत. केवळ सुदैवाने तिघेही तरुण बचावले. काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने याच ठिकाणी एक कार, तर एक ट्रक उलटला होता.

अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, अरविंद गिरी, योगिराज सोनवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घारगाव पोलीस, तसेच हिवरगाव पावसा टोलनाक्याचे विजय पवार हेही घटनास्थळी आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या