संगमनेरात गोवंश हत्या सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध

रात्रीच्या वेळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाटात बर्निंग कारचा थरार समोर आला खरा; पण या कारमध्ये चक्क गोमांस आढळून आल्याने संगमनेर शहरात गोवंश हत्या सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. जळत्या गाडीमधून गोवंश मांसाची दुर्गंधी पसरली होती. अज्ञातांनी पाणी मारून गाडी विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र गाडीतील गोमांस तस्कर मात्र गायब झाले होते.

शहरातील गोवंश हत्येविरोधात लढा देणाऱ्या कुलदेव ठाकूर, सचिन कानकाटे यांना कऱ्हे घाटात एक मारुती कार जळत असल्याचे निरोप आले. या गाडीमध्ये गोवंश मांस पूर्णपणे भरलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. तातडीने ते घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडी कोणीतरी येऊन विझविण्याचा प्रयत्नदेखील केला होता. गाडीवर पाणी मारण्यात आलेले होते. मात्र, ही गाडी कोणी विझविली, हे समजू शकले नाही. संबंधित कार्यकर्त्यांनी गाडीचे चोहोबाजूंनी फोटो घेतले. आतील फोटोदेखील विदारक होते. संपूर्ण गाडीमध्ये गोवंश मांस भरलेले होते. गाडीने अचानक पेट घेतला असावा आणि या मांसाची वाहतूक व विक्री करणारे तस्कर पळून गेले असावेत, असा अंदाज आहे.

कानकाटे आणि ठाकूर यांनी पोलिसांना फोन लावून ही माहिती कळविली. रात्री अकरा वाजेपर्यंत ते घटनास्थळी थांबले. मात्र, त्या ठिकाणी तोपर्यंत पोलीस आलेच नाहीत, असे त्यांनी सांगितले. रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भाने गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी अज्ञात वाहनचालक आणि गोवंश तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे. हेडकॉन्स्टेबल ओंकार रमेश शेंगाळ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष गोवंश हत्येला कारणीभूत

महाशिवरात्र असो की नवरात्र असो संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांतून होणारी गोवंश हत्या थांबलेली नाही. स्विफ्ट कारमधून नांदुर-शिंगोटे-निमोण मार्गावर गोमांस वाहतूक व विक्रीसाठी जात असताना पोलिसांना सापडून आले. संगमनेर तालुका पोलिसांनी ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. अपघात झाल्यामुळे ही घटना उघड झाली. आता पुन्हा एकदा स्विफ्ट कार जळाल्याने गोमांस तस्करी उघड झाली आहे. महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असलेली ही गोहत्या संगमनेरची बदनामी किती दिवस करणार आणि पोलीस प्रशासन त्यावर कोणती कारवाई करणार हा कळीचा मुद्दा ठरला आहे.