जागेच्या वादातून वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जागेच्या व्यवहाराचा न्यायालयात सुरू असलेला वाद पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवावा, या मागणीसाठी खांडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने प्रजासत्ताकदिनी शहर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही, सदर वृद्ध 60 टक्के भाजल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनिल शिवाजी कदम (70) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. अनिल कदम यांनी काही वर्षांपूर्वी गणेशवाडीतील सादीक रज्जाक शेख व सुमय्या सादीक शेख यांच्याशी एका जागेचा व्यवहार केला होता. त्यापोटी दोघांमध्ये साठेखतही झाले होते. मात्र, व्यवहार पूर्ण होत नसल्याने त्या दोघांमध्ये वाद होते. हा वाद अखेर न्यायालयात दाखल झाला आणि सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही या वादात हस्तक्षेप करून पोलिसांनी आपल्या घराचा ताबा घेऊन घरात बसलेल्या शेख कुटुंबीयांना बाहेर काढावे, अशी कदम यांची मागणी होती. मात्र, प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने कोणतीही कारवाई करणे अशक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सदरच्या ज्येष्ठ नागरिकाला वारंवार समजावून सांगूनही ते आपल्या मागणीवर कायम होते. त्यातूनच त्यांनी तीन दिवसांपूर्वी 24 जानेवारी रोजी पोलिसांना निवेदन देऊन आपल्या घरात अनाधिकाराने वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाला बाहेर न काढल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांना अर्ज प्राप्त झाल्याच्या क्षणापासून त्यांनी कदम यांचा कसून शोध घेतला. मात्र, अर्ज देताच कदम भूमिगत झाले होते.

शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आधीच तहसील कार्यालयाच्या आवारात हजर झालेल्या कदम यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. सहायक फौजदार राजू गायकवाड यांनी धाव घेत पेटलेल्या कदम यांच्यावर पाणी टाकून आग विझवली. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 60 टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या