
मोठय़ा आवाजातील फटाके फोडणारे सायलेन्सर, कानठळ्या बसविणारे सायलेन्सर, चित्रविचित्र हॉर्न वाजवत रस्त्यावर स्टंटबाजी करत रस्त्याने ये-जा करणाऱया नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईचा हिसका दाखविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्या दुचाकीचे कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सर तोडून टाकले.
संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेजपर्यंतच्या जुन्या मार्गावर सोमवारी दोघे स्टंटबाजी करत दुचाकी भरधाव वेगाने चालवित होते. याच दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱया दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, स्टंटबाजी करणाऱया तरुणांचे फोटोग्राफ्स, व्हिडीओ काढून संगमनेरचे पोलीस पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना व्हॉट्सऍपवर पाठविले होते.
वाघचौरे यांनी हे व्हिडीओ फोटोग्राफ्स बघितल्यानंतर ताबडतोब दोन्ही दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस नाईक राहुल डोके, राहुल सारबंदे, राजेश जगधने, पिचड आदी पोलीस कर्मचाऱयांनी काही वेळातच या दुचाकीस्वारांचा शोध घेत त्यांना पोलीस उपअधीक्षकांपुढे हजर केले. या हुल्लडबाज तरुणांकडील दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, कर्णकर्कश करणारे हॉर्न पोलिसांनी तोडून टाकले. तसेच एका दुचाकीचा मोठा आवाज करणारा सायलेन्सर मॉडिफाइड असल्यामुळे तोदेखील तोडून टाकला. याशिवाय दोन्ही दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. संगमनेरकर नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जर कोणी रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्यास किंवा नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज निर्माण करत असल्यास अशा गाडीचे व चालकाचे फोटो, व्हिडीओ पोलिसांना शेअर करावेत. पोलीस अशा स्टंटबाजांवर कारवाई करतील. – सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक, संगमनेर-अकोले