‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर, एफटीआयआयमध्ये पार पडला मुहूर्त

‘कटय़ार काळजात घुसली’ या गाजलेल्या संगीत नाटकावर सुबोध भावे यांनी चित्रपट केला. त्यानंतर सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘संगीत मानापमान’ नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘मानापमान’ या संगीतमय चित्रपटाचा मुहूर्त आज पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे झाला. सुबोध भावेंनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. सुबोध म्हणाले, मी एफटीआयआयचा विद्यार्थी नाही. पण ही संस्था माझ्यासाठी खास आहे. मी आयुष्यात काही तरी भारी काम करावं, यासाठी ही जागा मला कायम प्रेरणा देते. ज्या लोकांनी प्रभात स्टुडियोची स्थापना केली, ज्यांनी प्रभात स्टुडिओशी संबंधित कामं केली, त्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि ऊर्जा या जागी मिळते. शांताराम पाँड असे या जागेचे नाव आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’चा मुहूर्तही मी इथेच केला होता.