संगीत रंगभूमीची व्रतस्थ शिलेदार! मुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार  काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

‘मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

कीर्तीताई यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी! अजित पवार

“ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.