मी वेगळी, मुलींमध्ये माझं बालपण शोधतेय!

115

संगीता धनुरिये… एक संवेदनशील गृहिणी. आपली सगळी कर्तव्ये पार पाडताना, छंद, आवडीनिवडी जोपासताना ती स्वत: तिला तिच्या मुलींमध्ये शोधतेय…

मी एक सामान्य गृहिणी आहे, जिचे जग तिच्या कुटुंबाभोवती फिरते. त्यांच्या सुखसोयींसाठी सतत प्रयत्न असतो. मला असं वाटतं की, आपलं वेगळेपण हे स्वतःपेक्षा इतरांनाच चांगले समजत असते तरीदेखील अनेक गोष्टी असतात जे आपलं मन जाणत असतं. या मनातली गोष्ट म्हणजे मी फार स्वच्छंदी जगते, जे मनात असते तेच माझ्या ओठांवर असते. खोटं आवडत नाही.

मी घरीच असल्याने माझ्या मुलींमध्ये माझं बालपण शोधतेय. त्यांच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेतेय. निवांत वेळेत कादंबरी वाचणे, दिवाळी अंक वाचणे हा माझा आवडता टाइमपास आहे. एखाद्या दिवशी वाचन न करता झाडांसाठी वेळ देते. एखाद्या दिवशी स्वतःला चित्रातून व्यक्त करते, त्यासाठी वेळ देते. माझं एक तत्त्व आहे, स्वतःच्या भावना जपताना इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, हाच प्रयत्न असतो. पण तेवढीच मी मुक्तपणे जगणारी स्त्री आहे. माझ्या कुटुंबासाठी वेळ देतेच, पण या सगळ्यात मी स्वतःसाठी वेळ काढत असते. मी अगदी सामान्य आहे. त्यामुळे छोटय़ा गोष्टीतही मला आनंद वाटतो. माझा स्वभाव असा आहे की, मी कोणामध्येही सहज मिसळून जाते, कुठेही ऍडजस्ट होते आणि मनापासून मैत्री करते. हे माझं वेगळेपण आहे. पण हो, जे काही चांगले-वाईट आहे त्यातून चांगलेच शोधण्याचा प्रयत्न करते. एखादी वाईट गोष्ट घडली तर फारशी मनाला न लावता त्यातून काहीतरी चांगलंच होईल असा सकारात्मक विचार करते.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलिकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहीत आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहीत प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या