
सांगली शहरातील रिच आधार मल्टिट्रेड ऍण्ड डेव्हलपर्स एलपीपी या कंपनीत 10, 20, 24 आणि 36 महिन्यांच्या स्कीमवर पैसे गुंतवून त्या मोबदल्यात दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने मुंबई, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील सहा जणांची 83 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे.
सतीश काका बंडगर, सतीशची पत्नी जयश्री बंडगर, संतोष काका बंडगर (सर्व रा. करगणी) आणि अनिल अलदर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अनिल काशिनाथ चव्हाण (वय 34, रा. मूळ रा. करगणी, सध्या कांदिवली, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयितांना पैसे गुंतवून दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सतीश बंडगर याने अनिल चव्हाण यांचे 26 लाख, संतोष नामदेव सुरवसे (रा. जवळा, जि. सोलापूर) यांचे 23 लाख 50 हजार, प्रवीण दीपक कचरे (रा. श्रीरामपूर, जि. सोलापूर) यांचे 11 लाख 26 हजार, संगीता चंद्रकांत नलवडे (रा. अमनापूर) यांची 11 लाख 10 हजार, सागर गिरी गोसावी (रा. अकलूज, जि. सोलापूर) यांचे 3 लाख 5 हजार आणि अनिल एकनाथ सूर्यवंशी (रा. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) यांचे 8 लाख 57 हजार असे एकूण 83 लाख 48 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.
अनिल चव्हाण हे मूळचे आटपाडी तालुक्यातील करगणी येथील रहिवासी आहेत. ते मुंबई येथील कांदिवली परिसरात आपल्या पत्नीसह राहतात. संशयित सतीश बंडगर हा चव्हाण यांचा वर्गमित्र आहे. दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी चव्हाण हे सतीशला भेटण्यासाठी शहरातील एस.एस. कम्युनिकेशन दुकानाच्या तिसऱया मजल्यावरील रिच आधार मल्टिट्रेड ऍण्ड डेव्हलपर्स एलपीपी या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी संशयिताने चव्हाण यांना 10, 20, 24 आणि 36 महिन्यांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास लोकांना त्यांच्या रकमेवर जास्तीतजास्त परतावा देण्याची योजना सुरू केल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या कंपनीत त्याचे नातेवाईक, पत्नी, भाऊ हे डायरेक्टर असल्याचे सांगितले.
चव्हाण यांनी बंडगर हा मित्र असल्याने दहा महिन्यांच्या योजनेवर पैसे गुंतविले. यासाठी त्यांनी कंपनीच्या बँक खात्यावर 26 लाख रुपये पाठविले. त्याचबरोबर या कंपनीत संतोष सुरवसे, प्रवीण कचरे, सागर गोसावी आणि अनिल सूर्यवंशी यांनी एकूण 83 लाख 48 हजार 500 रुपये गुंतवले. पैसे गुंतवून ठरल्याप्रमाणे परतावा देण्यास बंडगर याने टाळाटाळ सुरू केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच चव्हाण यांनी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कंपनीच्या चौघा संचालकांविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.