सांगलीत साडेपाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे साडेपाच कोटी रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थाची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दोघांकडून 5 किलो 710 ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ, एक चारचाकी आणि एक दुचाकी जप्त केली आहे. मालवण तालुक्यातील आचरा येथील त्यांच्या एका साथीदाराची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. शहरातील शामरावनगर परिसरात पोलिसांनी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सलीम गुलाब पटेल (वय 49, रा. खणभाग, सय्यद अमीन रोड, सांगली) आणि अकबर याकुब शेख (51, रा. पिंगोली, मुस्लीमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना सांगलीतील श्यामरावनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम महाविद्यालयानजीक दोन व्यक्ती आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. काही वेळात तेथे एक मोपेड येऊन थांबली. त्याच्याजवळ एक चारचाकी येऊन थांबली. त्यामधून उतरलेल्या संशयिताच्या हातात एक बॉक्स होता. दोघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघा संशयितांची वन विभागाकडील अधिकाऱयांसमक्ष झडती घेतली असता बॉक्समध्ये पिवळसर तांबूस रंगांचे ओबडधोबड आयताकृती आकाराचे पट्टे पदार्थ असलेले आठ नग आढळले. त्याबाबत संशयित अकबर शेख यास विचारले असता त्याने हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असून, मालवण तालुक्यातील आचरा येथील एका साथीदारामार्फत याची विक्री करण्याकरिता आणल्याची कबुली दिली. वन अधिकाऱयांनी जप्त केलेल्या पदार्थाची प्राथमिक तपासणी करून तो व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ असल्याचे तसेच यावर प्रतिबंध घालण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघांवर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.