कर्ज मागणाऱ्यांची कुंडली एका क्लिकवर मिळणार, सांगली जिल्हा बँकेचा ‘स्कायमेट’ बरोबर करार

 

कर्ज प्रकरणातील हेराफेरी टाळण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्कायमेट या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर करार केला आहे. त्यामुळे कर्ज मागणाऱ्या ग्राहकांची कुंडली एका क्लिकवर बँकेच्या अधिकाऱ्यांना पाहावयास मिळणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संबंधित शाखेच्या फिल्ड ऑफिसरकडून सध्या ‘पीक पाहणी’चा रिपोर्ट घेऊन कर्जवाटप करण्याची पद्धत आहे. बँकेने फिल्ड ऑफिसर यांच्याकडे दोन किंवा त्यापेक्षा जादा शाखेचे कामकाज सोपवले आहे. तसेच, प्रत्येक फिल्ड ऑफिसरकडे किमान आठ ते बारा सोसायट्यांचे काम आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. यातून गडबड होत आहे. परिणामी चुकीचे कर्जवाटप होत आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. एखाद्याचे कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेत मोठे कर्ज असते. ते थकीत असल्याने तो जिल्हा बँकेकडे येतो. त्याची माहिती बँकेला मिळणे कठीण असते. त्यामुळे चुकीचे कर्जवाटप होऊन थकबाकी वाढते. काही ठिकाणी प्रत्यक्ष पीक पाहणी करून यादी मंजूर केल्यानंतर संस्थेकडून ती कमी क्षेत्राची झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करण्यासाठी आणि परिपूर्ण होण्यासाठी चुकीचा कर्जपुरवठा होऊ नये, यासाठी बँकेने प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला आहे. त्यासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार केला आहे.

सध्या ही कंपनी महाराष्ट्र शासनासाठी पीकविमा सर्व्हेचे काम करते. त्यामुळे कंपनीकडे जिह्यातील सर्व शेतकऱ्यांचा, त्यांच्या क्षेत्राचा, त्यांच्या कर्जव्यवहाराचा डाटा आहे.

सरासरी उत्पन्नाचा अंदाज बांधणेही शक्य

पेरणीनंतर किंवा उसाची नवीन लागण केल्यानंतर त्याचा रिपोर्ट 45 दिवसांत सॅटेलाइटकडून ई-मेलद्वारे मिळतो. द्राक्ष, डाळिंब बागांची पाहणी व हार्वेस्टिंगबाबत अचूक माहिती मिळते. पिकांमधून सरासरी किती उत्पन्न निघेल, याचा अंदाज बांधणेही शक्य आहे. या कंपनीचे सॉफ्टवेअर महाराष्ट्र शासनाच्या महसूल रेकॉर्डशी संलग्न असल्यामुळे शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची विक्री केली असल्यास त्या क्षेत्रावर कर्जवाटप होत नाही. तसेच, बँकेने दिलेल्या कर्जाचा विनियोग योग्य केला आहे किंवा नाही याची माहिती मिळते. त्यामुळे कर्जासाठी करण्यात येणारी हेराफेरी टाळण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या