सांगली बाजार समिती निवडणूक; अपात्रतेविरोधातील सुनावणी पूर्ण

सांगली बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणातील नऊ माजी संचालकांना अपात्र ठरविल्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी पणन संचालकांकडे सुनावणी पूर्ण झाली. माजी संचालक आणि तक्रारदाराच्या वतीने वकिलांनी पणन संचालक विनायक कोकरे यांच्याकडे म्हणणे मांडण्यात आले. माजी संचालकांच्या अपिलावर सोमवारी (दि. 17) रोजी निर्णय दिला जाणार आहे, त्यामुळे माजी संचालकांचे डोळे पणन संचालकांच्या निर्णयाकडे लागले आहेत.

बाजार समितीच्या नऊ माजी संचालकांच्या उमेदवारीवर अनिल शेगुणसे यांनी आक्षेप घेतला होता. माजी संचालकांनी गैरव्यवहार केल्याच्या ठपका चौकशी अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे या संचालकांकडून जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या कारणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केली होती. बाजार समितीतील संचालकांच्या कारभारावर चौकशी अहवालातील आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविले. या निर्णयाविरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे अपील केले होते.

सुनावणीवेळी माजी संचालकांच्या वतीने ऍड. धरणीधर पाटील यांनी म्हणणे मांडले. बाजार समितीच्या कारभाराची चौकशी झाली आहे. मात्र, अद्यापि संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. चौकशी अहवालामध्ये संदिग्धता आहे, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दिलेला आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. तक्रारदाराच्या वतीने ऍड. राजेश जामदार यांनी म्हणणे मांडत बाजार समितीच्या अपहारामध्ये माजी संचालक दोषी आढळले आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱयांचा निर्णय योग्य आहे. त्याप्रमाणे पणन संचालकांनीही माजी संचालकांना अपात्र करावे, असे म्हणणे मांडले.