संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सांगली पालिका सज्ज

संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सांगली महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पूरकाळात एकूण 34 ठिकाणी निवारा केंद्रे उभारली जाणार आहेत, तर हनुमाननगरमधील स्केटिंग ट्रकचा तात्पुरते हेलिपॅड म्हणून वापर केला जाणार आहे. महापालिकेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या संभाव्य आपत्ती निवारण तयारीचा आढावा घेतला.

या बैठकीस उपमहापौर उमेश पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, नगर सचिव चंद्रकांत आडके यांच्यासह नगरसेवक, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती स्लाईड शोद्वारे सर्वांना दिली. यामध्ये मनपाकडून आत्तापर्यंत 35 धोकादायक इमारती उतरवून घेतल्या आहेत, तर अन्य इमारतींना नोटिसा देण्यात आल्याचे सांगितले. पूरग्रस्त नागरिकांसाठी 36 ठिकाणी निवारा केंद्रे सुरू केली जाणार आहेत तसेच 10 जूनपर्यंत निवारा केंद्रांची स्वच्छता केली जाणार आहे.

‘आपत्ती मित्र ऍप’च्या माध्यमातून दैनंदिन नागरिकांना आपत्तीबाबतच्या सूचना वेळोवेळी दिल्या जाणार आहेत. निवारा केंद्राच्या आवारात शौचालय, विद्युत व्यवस्था अगोदरच सज्ज ठेवली जाणार आहे. निवारा केंद्रातील पूरग्रस्तांना चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावसाळापूर्वीच नालेसफाई वेळेत पूर्ण झाल्यामुळे जलद पाणी निचरा होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात असून, पाणीपुरवठा जॅकवेल बुडाल्यास टँकरने पाणीपुरवठय़ाची सोय मनपाकडून केली जाणार आहे. पूरपट्टय़ातील धोकादायक पोल काढणे, निवारा केंद्रात विजेची सोय, भागात पीए सिस्टिम कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. नदीकाठच्या स्मशानभूमी पाण्यात जात असल्याने कुपवाड स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात येणार आहे. पूरपट्टय़ातील जनावरांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. शासकीय बोटींचे नियोजन मनपाकडून केले जाणार असून, खासगी मंडळांच्या बोटींबाबत त्यांना कळवून त्यांची माहितीही महापालिका घेणार आहे. तसेच बोटींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसवून घेऊ नका, अशा सूचनाही बोटचालकांना दिल्या जाणार आहेत.

पूर ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरू नये म्हणून आवश्यक औषधसाठा, औषधफवारणी तातडीने सुरू केली जाणार आहे. सांगलीवाडीला तात्पुरते अग्निशमन तळ सुरू करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, अजिंक्य पाटील, विजय घाडगे, सुबराव मद्रासी, मंगेश चव्हाण, युवराज बावडेकर, जमील बागवान, जगन्नाथ ठोकळे, फिरोज पठाण, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, लक्ष्मी सरगर, नसीमा नाईक, सविता मदने आदी उपस्थित होते.

पूरकाळामध्ये हनुमाननगरमधील स्केटिंग ट्रकचा वापर हेलीपॅड म्हणून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. तसेच सांगलीवाडीमध्ये तात्पुरते अग्निशमन केंद्र सुरू करणार आहे. तसेच पूरकाळात 34 ठिकाणी निवारा केंद्र तयार करण्यात येणार आहेत.

– सुनील पवार, आयुक्त, सांगली महापालिका