निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या

निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सांगलीतल्या मिरज तालुक्यातील बेंळकी येथे उघडकीस आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे (28) अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.

अधिक माहितीनुसार, मुलगा महेश गव्हाणे याला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्यामुळे कर्जबाजारीतून कुटुंबाने आत्महत्या केली असल्याची गावात चर्चा आहे. मात्र, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर गव्हाणे यांच्या घराजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून त शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर तिघांनी आत्महत्या करण्याइतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी अन्नासो गव्हाणे यांच्या पोलीस मित्रांची, कुटुंबीयांची आणि शेजाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या