तिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला, दोन गटाच्या राड्यात तिघांची निर्घृण हत्या; 4 गंभीर

सांगली जिल्हा तिहेरी खुनाने हादरला असून पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून तलवारीने दोन गटात झालेल्या तुफान राड्यात तिघांचा मृत्यू झाला, तर 4 जण हे गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पलूस तालुक्यातील दुधोंडी या ठिकाणी दोन गटात झालेल्या तुफान राड्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तलवारी आणि धारदार शस्त्राने झालेल्या या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. मोहिते आणि साठे गटांमध्ये हा राडा झाला असून गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वादावादीचे प्रकार घडले होते.

शनिवारी दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटांना समजण्याचा प्रयत्न केला. मात्र रविवारी दुपारी हा वाद आणखी उफाळून आला. यातून मोहिते आणि साठे गटामध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते या तिघांचा मृत्यू, तर आकाश मोहिते, स्वप्नील साठे, दिलीप साठे आणि संग्राम मोहिते हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर दुधोंडी गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या