संगमेश्वर – फुणगूस खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढले, भातशेती पाण्याखाली

विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवार दुपार पासून पुन्हा धुवांधार बॅटिंग सुरू केल्याने ओसरू लागलेले पुराचे पाणी वेगाने भरत जाऊन खाडीभगला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून फुणगूस जुना बाजारपेठेत पाच ते सहा फूट पाण्याची पातळी आहे. खाडीलगत असलेल्या भातशेतीत पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले उभे भातपीक तब्बल 48 तासाहून अधिक काळ पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर आणि तेवढ्याच वेगाने पाणी भरण्याचा वेग त्यामुळे काल सकाळी पावसाची विश्रांती आणि ओसरणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे लोकांच्या नयना समोर तरळत असलेल्या आठवणी धूसर झालेला असताना आज पुन्हा धास्तावले आहेत.

पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर गेले चार दिवस सुरू झालेल्या पावसामुळे फुणगूस येथील शास्त्री खाडी दुथरी भरून खाडीभागात पुरसदृशय परिस्थिती निर्माण होऊन सर्वत्र जलमय परिस्थिती व जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गतवर्षीच्या महापुराची पुनरावृत्ती होणार की काय या भीतीच्या छायेत येथील जनता वावरत होती. मात्र सोमवारी सकाळी पावसाने बऱ्या पैकी विश्रांती घेतली व पुराचे पाणी ही ओसरु लागले.चार दिवसा नंतर खाडीभाग जनतेला सूर्य दर्शनही झाले.त्यामुळे पुराची धाकधूकही कमी झाली.

मात्र सूर्य दर्शन व पुराची कमी झालेली धाकधूकही काही तासा पुरतीच म्हणावे लागेल. सोमवारी दुपार पासून आतषबाजी करत पावसाच्या जोरदार अविश्रांत धारा बरसू लागल्या आणि पावसाळा मान देत अडीच दुथडी भरून वाहणाऱ्या मात्र काही प्रमाणात ओसरून कमी झालेल्या पाण्याचीही भोण्याचा वेग धारण करून हाहा म्हणता मंगळवार सकाळ पर्यंत आधी भरलेल्या पुराच्या पाण्याची सीमा ओलांडून खाडीभागातील सुमारे पंधरा ते सोळा गावात वेढा घातला.

फुणगूस जुना बाजारपेठ येथे सकाळी नऊ वाजे पर्यंत सुमारे पाच ते सहा फूट पाणी होते.सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्याचे वहाळ झाले होते या रस्त्यावरून पादचाऱ्यांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. सर्वत्र झालेल्या जलमय परिस्थिमुळे येथील जनजीवणावरही परिणाम झाले आहे.डिंगणी-संगमेश्वर रस्त्यावर काही ठिकाणी पाणी आल्याने तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांना दांडी मारण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

परचुरी, फुणगूस, कोंडये, डावखोल, मांजरे, मेढे, डिंगणी, पिरंदवणे, करजुवे आदी गावातील खाडीलगत असलेल्या भात शेतीला पुन्हा एकदा पाण्याने गिळंकृत केले. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक निसर्ग हिरावून नेणार की काय अशा अवस्थेत येथील शेतकरीवर्ग आहे.नेहमी प्रमाणे महावितरणनेही लपाछुपीचा खेळ सुरू केला होता.अजून ही पावसाचा जोर आणि पाणी भरण्याचा वेग सुरू असल्याने पुन्हा येथील जनतेच्या मनात गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी जाग्या झाल्यात आहेत.