सानिया मिर्झा सुपरमॉम! मातृत्वानंतर पुनरागमन करून जिंकली टेनिस स्पर्धा

625

हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन वर्षांनी पुनरागमन करत स्पर्धेत विजय मिळवला आहे. सानियाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या महिला दुहेरी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. मातृत्वासाठी दोन वर्षं टेनिसपासून लांब असलेल्या सानियाने पुनरागमनातच यश मिळवलं आहे.

शनिवारी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. सानिया मिर्झा आणि नादिया किचेनोक (युक्रेन) या दोघींचा मुकाबला झांग शुइ आणि पेंग शुइ या चिनी जोडीशी झाला. सानिया-नादिया या जोडीने शुइ जोडीला 6-4, 6-4 असं पराभूत केलं. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात या जोडीची गाठ तमारा जिदानसेक आणि मेरी बुजकोवा या चेक-स्लोवेनियन जोडीशी पडली होती. तिथे या जोडीला पराभवाची धूळ चारत सानिया आणि नादियाने अंतिम फेरीत मजल मारली.

सानिया मिर्झा हिने 2017मध्ये चीन ओपन स्पर्धेत तिचा शेवटचा सामना खेळला होता. दोन वर्षांच्या मातृत्व रजेव्यतिरिक्त तिला दुखापतीचाही सामना करावा लागला होता. आता पुनरागमन करून विजेतेपद पटकावल्यानंतर तिने अजूनही तिचं खेळातलं आव्हान संपुष्टात आलं नसल्याची ग्वाही दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या