युट्युब व्हिडीओ पाहून सॅनिटायझर बनवणाऱ्याला अटक

305

आंध्र प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने श्रीनिवास नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. विकाराबाद जिल्ह्यातील सिद्दापुरम गावात राहणारा श्रीनिवास हा 6 वी नापास व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या गावातल्या लोकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मात्र पोलिसांनी पक्की माहिती आणि अचूक तपास केल्यानंतरच त्याला अटक केली आहे. श्रीनिवास हा काही काळ पेट्रोल पंपावर काम करत होता, त्यानंतर त्याने पेंट रिमूव्हर विकायला सुरुवात केली होती.

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सॅनिटाझरची मागणी वाढली आहे. ही मागणी पाहून श्रीनिवासने देखील सॅनिटायझर बनवण्याचं ठरवलं. स्वस्तातल्या स्वस्तात सॅनिटायझर कसा बनवू शकतो हे त्याने युट्युबवर पाहून शिकायला सुरुवात केली. त्याला केमिकलचा पुरवठा करणाऱ्यांनी त्याला स्वस्तात सॅनिटायझर बनवण्यासाठी इथेनॉल ऐवजी मिथेनॉल वापर असा सल्ला दिला होता.

श्रीनिवासने एक जागा भाड्याने घेतली आणि तिथे स्वस्तातले सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली. त्याने सॅनिटायझरला परफेक्ट गोल्ड सॅनिटायझर नाव दिले आणि विकायला सुरुवात केली.श्रीनिवासने सॅनिटायझर प्रकासम जिल्ह्यात वितरीत करण्यास सुरूवात केली होती. पोलिसांनी वितरण यंत्रणेचा माग काढत हे सॅनिटायझर कुरिचेडू, डोनाकोंडा आणि दारसी भागातील मेडीकलच्या दुकानात विकल्याचं शोधून काढलं. या दुकानांमध्ये 200 बाटल्या विकल्या गेल्या होत्या.

श्रीनिवासनचा दोष स्वस्त सॅनिटायझर बनवले हा नव्हता. त्याचा दोष हा होता की त्याने इथेनॉल ऐवजी मिथेनॉल वापरलं आणि अट्टल बेवड्यांनी दारू न मिळाल्याने हे सॅनिटायझर प्यायलं. हे सॅनिटाझर प्यायल्याने 16 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक नेमलं होतं. पोलिसांनी प्रकासम जिल्ह्यातून 69 सॅनिटायझरच्या बाटल्या जमा केल्या होत्या यातल्या 8 ब्रँडवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. या सॅनिटायझरची निर्मिती करणारी कंपनी कुठे आहे ते त्यांनी शोधून काढायला सुरुवात केली. यातील परफेक्ट गोल्ड या कंपनीचा पत्ता खोटा असल्याचं त्यांना दिसून आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या