पश्चिम विभागीय पिस्तोल नेमबाजीत संजना सावंतला सुवर्ण, विनीत झांजेला रौप्यपदक

ठाणे येथील 10 एक्स शूटिंग क्लबच्या नेमबाजांनी वरळी शूटिंग रेंजवर महाराष्ट्र रायफल असोसिएशनने आयोजित केलेल्या नवव्या पश्चिम विभागीय पिस्तोल शूटिंग स्पर्धेत चमकदार यश मिळवले. संजना सावंत हिने महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तोल प्रकारात प्रथम स्थान पटकावून सुवर्णपदकाची कमाई केली. तर पुरुष गटात मूकबधिर नेमबाज विनीत झांजे याने 10 मीटर्स एअर पिस्तोल प्रकारचे वैयक्तिक रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत राज्यातील नामांकित नेमबाज सहभागी झाले आहेत. ठाण्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते नेमबाज अभिजित राव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आणि ठाणे एक्स शूटिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या युवा नेमबाजांनी या स्पर्धेत चमकदार यश मिळवले आहे. संजना सावंत ही टॅलेंटेड युवा नेमबाज असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजीत यश मिळवण्यासाठी सिद्ध झाली आहे. तर विनीत झांजे हा मूकबधिर असून नेमबाजांच्या खुल्या गटात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे.