संजय दत्त लवकर सुटलाच कसा? दोन आठवडय़ात उत्तर द्या!

29

सामना प्रतिनिधी । मुंबई

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला कोणत्या निकषांवर शिक्षेतून सूट देण्यात आली याबाबतची माहिती आता राज्याचे ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे मुंबई उच्च न्यायालयाला देणार आहेत. अर्थात न्यायालयाने त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. संजय दत्त लवकर सुटलाच कसा, याचे उत्तर दोन आठवडय़ात द्या, असेही न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधन जाधव यांनी सरकारला बजावले आहे.

शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच संजय दत्तची सुटका करण्याच्या निर्णयाला पुण्यातील नागरिक प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आव्हान दिले आहे. या याचिकेची सुनावणी आज दुपारी झाली. त्यावेळी सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी या प्रकरणात ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे स्वतः बाजू मांडणार असल्याचे सांगून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास 15 दिवसांचा वेळ मागून घेतला. त्यामुळे खंडपीठानेही हे प्रकरण दोन आठवडे तहकूब केले.
या प्रकरणाची गेल्या वेळी सुनावणी झाली तेव्हा संजय दत्तला शिक्षेत सवलत देताना कोणते निकष अमलात आणले गेले तसेच कोणती प्रक्रिया पार पाडण्यात आली, असा सवाल करत त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच सुनावणी आजपर्यंत तहकूब केली होती. मात्र आज सुनावणी झाली तेव्हा या प्रकरणात ऍडव्होकेट जनरल स्वतः बाजू मांडणार हे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या