…त्यांच्या हातातून किल्ला कधीच निसटला आहे; संजय कदम यांचे रामदास कदमांवर टिकास्त्र

खेडमध्ये 5 मार्च रोजी शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये त्याच गोळीबार मैदानावर सभा घेणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमधील माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते संजय कदम यांनी रामदास कदमांवर टीकास्र सोडलं आहे. संजय कदम यांनी नुकताच शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासहेब ठाकरे) प्रवेश केला आहे. संजय कदम यांनी रामदास कदमांना लक्ष्य केले आहे. तसेच, त्यांनी रामदास कदम यांना जाहीर आव्हानही दिले आहे.

रामदास कदमांच्या डोळ्यांवर झापड असल्याचे संजय कदम म्हणाले. खेडच्या सभेला आलेल्या स्थानिकांना सर्व माहिती आहे. कदाचित रामदास कदमांच्या डोळ्यांवर झापड आहे. मतदारसंघातले लोक त्यांना ओळखत नाहीत. त्यांचे सख्खे भाऊ, त्यांचे पुतणे, त्यांच्या गावातले सरपंच, त्यांचे शाखाप्रमुख हे सगळे सभेला होते. त्यांना जर हे लक्षात येत नसेल, तर स्थानिक काय, बाहेरचे काय? त्यामुळे रामदास कदम यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, अशा शब्दांत संजय कदम यांनी टीका केली आहे.

खेड म्हणजे रामदास कदम यांचा बालेकिल्ला होता. आता फक्त रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक आहे. बाकी किल्ला कधीच त्यांच्या हातातून गेला आहे. तो किल्ला हातातून गेल्यामुळेच रामदास कदम सातत्याने काहीतरी बोलत असतात. योगेश कदम कधी गावचा सरपंच झालेला नाही, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य झालेला नाही. मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायच समिती, सरपंच ते आमदार झालो आहे, असेही संजय कदम यांनी सांगितले.

योगेश कदमच्या पाठिशी चार वर्षं बाप आहे. त्याला खेडमधले काय माहिती आहे, असा सवालही त्यांनी केला. बापाने पर्यावरणातला लुटलेला पैसा याच्यातून त्यांची आमदारकी आहे. तुम्ही चालवलेली नाटकं लोकांना माहिती आहे. आता तुझी आमदारकी बघ. शिवसैनिक होते म्हणून तुला आमदारकी मिळाली. आता तुझ्या पाठिशी आहे कोण, असा सवालही संजय कदम यांनी योगेश कदम यांना केला आहे.

रामदास कदम 2009 ला खेडमधून पराभूत झाले. भास्कर जाधव यांच्यासोबत खेड, गुहागर जोडला आहे. भास्कर जाधवांनी यांचा दारूण पराभव केला आहे. आता तर डिपॉझिटही जाईल. दुसऱ्या-तिसऱ्याची नावे सांगण्यापेक्षा रामदास कदमनीच तिथून भास्कर जाधवांच्या विरोधात उभे राहून दाखवावे, असे आव्हानही संजय कदम यांनी रामदास कदम यांना दिले आहे.