संजय काशीकर

महेश उपदेव

विदर्भातील ज्येष्ठ नेपथ्यकार, नाटय़ दिग्दर्शक संजय काशीकर यांची आयुष्याच्या रंगमंचावरून मध्यंतरी अचानक एक्झिट झाली. राज्यस्तरीय ४५च्या वर पुरस्कार मिळवणारे संजय काशीकर यांच्या जाण्याने नवोदित नाटय़ कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भात रंगभूमीची सेवा करण्याचे व्रत घेतलेला नाटय़वेडा. नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत आणि अभिनय या साऱया बाबींकडे अभ्यासपूर्ण बघण्याची संजय काशीकर यांना सवय होती. जीव ओतून काम करण्याची तळमळ. आपण सादर  करीत असलेल्या नाटकाला सर्वोत्कृष्ट हेच शीर्षक प्रेक्षकांनी द्यावे यासाठी ते प्रचंड मेहनतीने नाटक सादर करीत. आजपर्यंत अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले.

प्रत्येक कलाकाराला हव्याहव्याशा वाटणाऱया संजय काशीकर यांचा एका अपघाताने मृत्यू झाला यावर कोणाचा विश्वास बसत नाही. आजही स्मितहास्य असलेले संजय काशीकर काळी बॅग घेऊन आपल्या सोबत गप्पा मारीत असल्याचे प्रत्येकाला भासते.

५९ वर्षीय संजय काशीकर यांनी राज्य नाटय़ स्पर्धा असो की हौशी किंवा व्यावसायिक नाटक, प्रत्येकाच्या नाटकात नेपथ्याची तर कधी प्रकाश योजना सांभाळत कलावंताचा उत्साह वाढविण्याचे काम केले आहे. विदर्भातील ज्येष्ठ नेपथ्यकार गणेश नायडू यांचा कित्ता संजय काशीकर गिरवत होते. राज्य नाटय़ महोत्सव, कामगार कल्याण केंद्रामधील स्पर्धा त्यांनी गाजविल्या. केवळ नागपूर नव्हे तर विदर्भातील रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. १९८६ पासून नाटय़ क्षेत्रात असलेले संजय काशीकर यांनी अनंताचे प्रवासी, बेघर, मंतरलेली चैत्रवेल, प्रीती मिळेल का हो, शेजारी, बाजार, मुक्तिपथ, राधी, ऋतू आठवणींचे, दोन ध्रुव, तर्पण आदी २०० पेक्षा अधिक नाटकांना पार्श्वसंगीत, नेपथ्य केले असून या नाटकांना पुरस्कार मिळाले आहेत. संजय काशीकर यांनी नवोदित कलावंतांना नेहमीच प्रोत्साहन दिले. कोणत्याही कलावंतांचे नाटक असेल, तिथे ते आपली काळी बॅग घेऊन पोहोचलेले असायचेच. नाटय़ कलावंतांना येणाऱया समस्या ते सोडवायचे. त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटत असते. त्यांचा नाटय़ क्षेत्रातील दांडगा अनुभव लक्षात घेता नागपूर शहरात किंवा विदर्भात नाटय़ स्पर्धा असो, वा नाटकाचा शो त्याकरिता त्यांना आवर्जून आमंत्रण दिले जायचे. वेळेवर कोणतीही समस्या उद्भवली तर संजय स्वतः पुढाकार घेऊन कलावंताची समस्या मिटवून शोला सुरुवात करायचे. त्यामुळे नाटय़ क्षेत्रात त्यांना वाढती मागणी होती. साधी राहणी, स्मितहास्य आणि अतिशय शांत स्वभाव हे त्याचे वैशिष्टय़ होते. अनेक कलावंत त्यांच्या या गुणांचे आजही कौतुक करतात.

साडेतीन दशके रंगभूमीची अविरत सेवा करणारा संजय काशीकर नावाचा प्रयोग नेपथ्याला पोरका करून गेला. कुणाचेही नाटक असो, कुठेही असो आणि केव्हाही, संजय काशीकर आणि नेपथ्य हे समीकरण ठरलेले होते. ज्येष्ठ कलावंतापासून नवोदित कलावंतापर्यंत प्रत्येकासाठी खंबीरपणे उभा असणारा असा रंगकर्मी विदर्भात परत होणे नाही. नेहमी सजग राहणाऱया कलावंताला आपण मुकलो आहोत अशी भावना प्रत्येक कलावंत व्यक्त करीत आहे.