सुशांतच्या भूमिका रणवीरला दिल्याचा आरोप, संजय लीला भन्साळी यांची तीन तास चौकशी!

474

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आज कसून चौकशी करण्यात आली. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी भन्साळी यांच्यासह त्यांची वकीलदेखील यावेळी उपस्थित असल्याचे कळते. भन्साळी यांनी सुशांतला काही चित्रपटांची ऑफर दिली होती. मात्र, सुशांतच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने त्याच्याकडून हे चित्रपट काढून घेण्यात आले होते. त्यामुळे भन्साळी यांची चौकशी करण्यात आल्याचे कळते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जूनला त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी शेखर कपूर आणि संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्यानुसार आज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात साडेबाराच्या सुमारास दाखल झाले होते. त्यानंतर सलग तीन तास भन्साळी यांची चौकशी केल्यानंतर साडेतीनच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.

बिहारमध्ये 8 जणांविरोधात तक्रार

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये आठजणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीरकुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली असून, त्यांत संजय लीला भन्साळी, करण जोहर, आदित्य चोप्रा, साजीद नाडियाडवाला, सलमान खान, भूषण कुमार, एकता कपूर आणि दिनेश विज्जन यांचा समावेश आहे.

आतापर्यंत 21 जणांची चौकशी

पोलिसांनी सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 21 जणांची चौकशी केली आहे. ज्यात सुशांतच्या कुटुंबातील काही सदस्य, अभिनेत्री रेहा चक्रवर्ती, मुकेश छाब्रा, ‘यशराज फिल्म’ची शानू शर्मा, अभिनेत्री संजना सांघी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

…म्हणून भन्साळी यांची चौकशी

संजय लीला भन्साळी यांनी सुशांतसिंह राजपूत याला अनेक सिनेमांची ऑफर केली होती. त्यांत ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांचा समावेश होता. मात्र, तारखा मिळत नसल्याने हे दोन्ही सिनेमे त्याच्याकडून काढून रणवीर सिंग याला देण्यात आले होते. त्यामुळे भन्साळी यांची चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या