‘उरी’नंतर मोठ्या पडद्यावर झळकणार ‘बालाकोट एअरस्ट्राईक’

724

देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि युद्धावर आधारित असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. उरी हल्ल्यावर आलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. विकी कौशलने चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने ‘बालाकोट एअरस्ट्राईक’ घडवून केलेल्या शौर्याबाबत ‘बालाकोट एअरस्ट्राईक’ चित्रपट येणार आहे. संजय लीला भन्साली, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर अभिषेक कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची आधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

26 फेब्रुवारी 2019 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकवर संजय लीला भन्साली, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर चित्रपट बनवणार आहे. तर अभिषेक कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदुस्थानी जवानांच्या शौर्याला समर्पित करण्यात येणार आहे. या एअरस्ट्राईकवर दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असून दुसऱ्या चित्रपटात विवेक ओबेरॉय दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि आग्रा या जागांची निवड करण्यात आली आहे.

14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी घडवलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई दलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या शिबिरांवर हल्ला केला होता. त्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. हवाई दलाच्या या शौर्याने जगाला हिंदुस्थानच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले होते. हवाई दलाच्या या शौर्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या